हव्या हव्याचा हव्यास

कमीतकमी गरजा असल्या की, त्या पूर्ण करण्यात अडचणी येत नाहीत आणि मन नेहमीच समाधानी आणि तृप्त राहतं पण असं होत नाही याला कारण माणसाचा स्वभाव.

Story: मनातलं |
11th January, 05:16 am
हव्या हव्याचा हव्यास

एखाद्या गोष्टीची तृष्णा मनात असणं म्हणजे हव्यास. उत्कंठा किंवा सोस अगदी टोकाची सीमा गाठतो तेव्हा ती हवस होते त्या पायी मग माणूस कुठलाही गुन्हा करायलाही मागे पुढे पहात नाही. आयुष्यात या अतिरेकी हव्यासापोटी माणूस सतत दुखी राहू लागतो. जरुरीपेक्षा जास्त असलेला हव्यास हा माणसाला पशूत्वाकडे घेऊन जातो. इथे कधीकधी पशू तरी बरे म्हणायची वेळ येते कारण पशू हे जेव्हा त्यांना खरोखरीच भूक लागते तेव्हाच शिकार करतात पण माणूस भूक असो नसो जास्तीची साठवण करून ठेवण्यात धन्यता मानतो. त्यावेळी इतरांचं लुबाडण्याचीही त्याला मनातून इच्छा असते. आपल्याकडे जास्तीतजास्त धनाचा, कपड्यांचा, घरांचा, प्रॉपर्टीचा भाग असावा असा अट्टहास नडतो. कमीतकमी गरजा असल्या की त्या पूर्ण करण्यात अडचणी येत नाहीत आणि मन नेहमीच समाधानी आणि तृप्त राहतं पण असं होत नाही याला कारण माणसाचा स्वभाव. हा हावरटपणा करत अजून हवं अजून हवं असं करत आपल्या इच्छा-आकांक्षा, कामना वाढवत असतो. आयुष्यात या कामनेच्या दोरावरून तोल सावरत जाणं अवघड असतं त्याच्या एका टोकाला ‘आता बास’ तर दुसऱ्या टोकाला ‘हव्यास’ असतो. आपण कुठलं टोक गाठायचं हे ठरवता आलं पाहिजे. कारण जसजसे पुढे जाऊ तसतसे हव्यासाचे अंतर वाढतच जाते जसे क्षितिज पुढे जात असते ते गाठता येत नाही तसे हव्यासाच्या टोकापर्यंत आपण पोहचत नाही. लहानपणी वाचलेली कथा इथे आठवते एक राजा एका गरीब माणसाला सांगतो तू सुर्योदयापासून चालत जाऊन सूर्यास्तापर्यंत परत राजवाड्यात येशील तेवढी जमीन मी तुला देईन आणि जास्तीतजास्त मिळण्याच्या हव्यासामुळे तो चालत राहतो, चालत राहतो सूर्यास्त व्हायला येतो तेव्हा परत फिरतो.  धावू लागतो आणि अतिश्रमामुळे जमिनीवर कोसळतो.  मिळालेले धन जास्तीच्या हव्यासामुळे मातीमोल ठरते. 

कुणाला सोन्यानाण्याचा हव्यास असतो, कुणाला पैसाअडका, कुणाला कपड्यांचा, कुणाला जमीनजुमल्याचा, कुणाला वस्तु गोळा करण्याचा, कुणाला गाडीघोड्याचा, कुणाला घरे बंगल्याचा असा ज्याचा त्याचा हव्यास हा त्याला आनंद देणारा असतो पण तो आनंद कायम टिकण्यासाठी कुठेतरी थांबणं गरजेचं असतं हे त्याला त्या नादात कळत नाही.  नोटा बंदीच्या काळात अशी हव्यासापोटी साठवलेली कमाई किती तरी लोकांची कवडीमोल ठरली. नोटांची बंडलेच्या बंडले फेकून द्यावी लागली. अति सोस केल्यामुळे त्या धनाचा कुणालाच उपयोग झाला नाही. कधीकधी जास्त सोन्याचा हव्यास आपल्या जीवाला धोका बनू शकतो. त्या सोन्याचा पण कुणाला तरी हव्यास निर्माण होतो आणि त्या सोन्यासाठी जीव जाऊ शकतो. अति लोभो न कर्तव्या: खूप संपत्ती असली तरी त्या व्यक्तीला सुख मिळतेच असे नाही. ते सुख उपभोगण्यासारखी परिस्थितिही असावी लागते. संपत्ती कमावता कमावता आयुष्य निघून जाते ते धन उपभोगायचे राहून जाते नाहीतर दुसऱ्या कुणाच्या भलत्याच्या हाती लागते. अशा वेळी आपण आयुष्यभर पैशांशिवाय इतर काहीच कमावलं नाही याची जाणीव होते. देव एका गरीब भिकाऱ्यावर प्रसन्न होतो तुझी झोळी पसर मी तुला सोन्याच्या मोहरा देतो म्हणतात पण अति हव्यासापोटी तो देवाला आता पुरे बास असं म्हणतच नाही आणि त्याची झोळी फाटून सर्व मोहरा मातीत मिसळून मातीमोल होतात ही बोध कथा आपण लहानपणी वाचलेली पण तरीही आपला स्वभाव बदलत नाही. मलाही मी जिथे कुठे फिरायला म्हणून जाते तिथली आठवण म्हणून एक तरी सुवेनीयऱ् विकत घेतेच अशी माझ्याकडे शोकेसमध्ये बरीच गर्दी झाली आहे. त्या वस्तु ठेवायला आता पुरेशी जागा नाही तरीही माझी हौस काही भागत नाही. माझी नात ही माझ्यावर गेलीये ती पण कुठे फिरायला जाते तिथून सॉफ्ट टॉईज आणतेच अशी तिच्या रूममध्ये दीडशे ते दोनशे टॉईज गोळा झाली आहेत. पण तरीही अजूनही तिची हौस फिटली नाही. लहान मुलांसारखेच आपलेही होते. कपाट साड्यांनी ओसंडून चाललेले असले तरी नवीन कुठे साडी दिसली की ती घ्यावीशी वाटतेच भले ती नेसली जाईल किंवा नाही पण विकत घेण्याची हौस भारी असते. मग कुणाला तरी देता येईल या विचाराने त्याची खरेदी होतेच. प्रत्यक्षात दिली जाते किंवा नाही ते वेगळेच. 

असा खरेदीचा सोस आम्हा बायकांना फारच असतो. त्यातून मिळणारा आनंद जरी मोठा असला तरी नंतर त्या वस्तूंचा साठा बघून आपल्यालाच त्याचं काय करावं हा प्रश्न पडतो. प्रख्यात सिने नायिका जयललिता यांच्याकडे असलेला साड्या-कपड्यांचा, चप्पल-शूज, दागदागिने यांचा साठा इतका अमर्यादित होता की गिनती करणं अवघड होतं. त्यांच्या जाण्यानंतर त्याचं काय करायचं हाही प्रश्न होता. इतक्या गोष्टींचा कधी त्यांनी वापर सुद्धा केला नसेल पण साठवणूक करण्याची हौस भारी. शिवाय विनाकारण पैशाचा अपव्यय होतो ते वेगळेच. त्यासाठी मनावर ताबा ठेवून कमीतकमी गरजा ठेवल्याने असा हव्यास वाढत नाही.  


प्रतिभा वासुदेव कारंजकर, फोंडा