नवीन वर्षात करा ‘डिजिटल डिटॉक्स’ची संकल्पना!!

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी जसे शरीर डिटॉक्स केले जाते, तसेच या नववर्षात मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी, डिजिटल गोष्टींपासून दूर राहण्यासाठी ‘डिजिटल डिटॉक्स’ करण्याचीही संकल्पना अगदी काळाची गरज बनली आहे.

Story: आरोग्य |
04th January, 04:34 am
नवीन वर्षात करा ‘डिजिटल डिटॉक्स’ची संकल्पना!!

आपल्या बारीकसारीक दैनंदिन गोष्टींही हल्ली मोबाईल इंटरनेटशिवाय होत नाहीत. अगदी अन्नपाणी नसले तरी चालेल पण हातात मात्र मोबाईल पाहिजे. अपडेटेड राहण्याच्या नावावर दर दोन मिनिटात सोशल मिडिया चाळता आला पाहिजे. कामानिमित्ताने असो वा विनाकारण व्यसनाधीन होऊन असो, पण डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे जाणिवा, एकाग्रता, भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता खालावते आहे. डिजिटल व्यसनाधीनतेमुळे मानसिक आरोग्य खालावणे, एकाकीपणा येणे, मेंदूचा विकास खुंटणे, झोप विस्कळीत होणे, डोळ्यांवर परिणाम होणे अशी लक्षणे लोकांमध्ये वाढू लागली आहेत. 

नव्या वर्षाच्या आगमनाआधी अनेक संकल्प मनात रुंजी घालत असतात. नव्या संकल्पना पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आपण असतो. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी जसे शरीर डिटॉक्स केले जाते, तसेच या नववर्षात मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी, डिजिटल गोष्टींपासून दूर राहण्यासाठी ‘डिजिटल डिटॉक्स’ करण्याचीही संकल्पना अगदी काळाची गरज बनली आहे.

काय आहे ‘डिजिटल डिटॉक्स’?

सतत मोबाईल फोन, लॅपटॉपवर काम करत राहिल्याने त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. विविध प्रकारच्या गॅझेट्सचा वाढलेला वापर यामुळे, ताणतणाव आणि चिंता यांसारख्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीमध्ये आपण आठवड्या अखेरीस २ दिवस, १ आठवडा किंवा १ महिना अशा ठराविक कालावधीसाठी फोन, टिव्ही, लॅपटॉप, इंटरनेट किंवा सोशल मिडियाचा वापर न करता आपला दैनंदिन वेळ घालवणे याला आपण ‘डिजिटल डिटॉक्स’ म्हणू शकतो.

कसे करायचे ‘डिजिटल डिटॉक्स’?

मोबाईल नजरेपासून दूर ठेवा : 

मोकळ्या वेळेत आपण लगेच मोबाईल वापरायला घेतो अन् मग तासंतास रिल्स किंवा फेसबुक स्क्रोल करतो. त्याऐवजी मोबाईल हातात न ठेवता मुद्दाम आपल्या नजरेपासून दूर ठेवण्याची सवय लावा. मोजक्या वेळेसाठी बाहेर निघत असल्यास मोबाईल घरी ठेवून निघा. जेव्हा गरज असेल तेव्हाच मोबाईलचा वापर करा. मोबाइल लॅपटॉप वरील होम स्क्रीन डिक्लटर करा. प्राधान्य नसलेल्या सूचना आणि अपडेट्स बंद करा. अनावश्यक गट आणि मेलिंग सूचीमधून सदस्यत्व रद्द करा. स्क्रीन वेळ/ॲप शेड्यूल सेट करा. जेवणाच्या टेबलावर व झोपेच्या एक तास आधी स्क्रीन वापरू नका.

ठराविक वेळ मोबाईल बंद ठेवा : 

मोबाईलपासून दूर रहायचे ठरवूनही सवय सुटत नसल्यास काही ठराविक कालावधीसाठी मोबाईल बंद ठेवून पहा किंवा थोड्या वेळासाठी मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवा. या कालावधीमध्ये आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा घरातील व्यक्तींसोबत वेळ घालवायचा प्रयत्न करा.

नॉन-डिजिटल राहण्याचा प्रयत्न करा : 

कोणतेही काम नसताना किंवा मोळका वेळ असताना नॉन-डिजिटल राहण्याची सवय लावा. या वेळेत आपल्या छंदांवर लक्ष केंद्रित करा, किंडलऐवजी पुस्तक वाचणे, मोबाईलवर नोट्सऐवजी डायरी पुस्तकात लिहिणे, कला कौशल्ये किंवा काही वर्कआऊट्स करा. यामुळे, मोकळ्या वेळेत मोबाईल वापरण्याची सवय हळूहळू कमी होईल.

२०-२०-२० नियम पाळा : 

कधी कधी पर्याय नसल्याने दिवसभर सतत स्क्रीनकडे पाहून आपले डोळे थकतात. यासाठी २०-२०-२० नियम पाळणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी २० फूट कोणत्याही गॅजेट्स आणि स्क्रीनपासून दूर पहा. यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होतो.

चांगली झोप घ्या : 

डिजिटल बर्नआउट टाळण्यासाठी झोप एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. सतत येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे झोपेला प्रेरित करणारे हार्मोन- मेलाटोनिनची पातळी कमी होते व यामुळे झोप खराब होते. कमी झोपेमुळे स्ट्रेसही वाढतो. त्यामुळे चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा. स्क्रीन पाहत असल्यास, निळा प्रकाश-अवरोधित चष्मा वापरा. तसेच, बेडरूमला स्क्रीन-फ्री झोन बनवा. झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याऐवजी, ध्यान करा. 

डिजिटल उपकरणांच्या वापराच्या अतिरेकामुळे अनेकांच्या कामात, नातेसंबंधात, मानसिक आणि शारीरिक आरोग्यात तसेच आर्थिक घडीवर विपरित परिणाम दिसून येऊ लागले आहेत. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवरदेखील त्याचे दुष्परिणाम होताना दिसून येत आहेत. ही स्थिती थांबवण्यासाठी नव वर्षात ‘डिजिटल डिटॉक्स’ ची संकल्पना आचरणात आणण्याची खूप गरज आहे.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर