उद्योजक दत्ता नायक यांचा नागरी सत्कार

लोकसभेचे खासदार शशी थरूर यांची उपस्थिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th January, 12:33 am
उद्योजक दत्ता नायक यांचा नागरी सत्कार

दत्ता नायक यांचा सत्कार करताना लोकसभेचे खासदार शशी थरूर. सोबत इतर.

मडगाव : भारत हा विविध भाषांचा, भौगोलिक रचनांचा, विविध जातीधर्मांचा व संस्कृतींचा असून विविधतेतील एकता कायम राहण्याची गरज आहे. लोकशाहीत संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क व स्वातंत्र्य कायम राह‍ावे, हा खर्‍या भारताचा गाभा व विचार आहे, असे मत खासदार शशी थरुर यांनी मांडले. दक्षिणायन अभियान गोवा व नागरी समाज गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक व उद्योजक दत्ता दामोदर नायक यांचा त्यांच्या सत्तरीनिमित्त नागरी सत्कार करण्यात आला.
मडगावातील गोमंत विद्यानिकेतन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री व लोकसभेचे खासदार शशी थरूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयडिया ऑफ इंडिया या विषयावर त्यांनी भाष्य केले. भाषाशास्त्रज्ञ व दक्षिणायन अभियानचे संस्थापक डाॅ. गणेश देवी, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट व गोव्याचे नामवंत उद्योजक अवधूत तिंबलो हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय दक्षिणायन अभियान गोवाचे निमंत्रक अॅड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो व नागरी समाज गोवाचे डाॅ. फ्रान्सिस्को कुलासो हे व्यासपीठावर होते.
थेट मांडणी व कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही असे लिखाण दत्ता नायक यांनी केले. जीवन प्रवासातून ते घडलेत हे दिसून येते. ‘एका नास्तिकाचा गाभारा’ या पुस्तकात ते आपण नास्तिक का आहे ते सांगितले आहे. भारतात ते प्रमाण ३ टक्के आहे. नास्तिकांनी लिहिल्यास धर्माच्या नावाखाली धर्मांधवृत्ती समाज नासवण्याचे काम करत आहेत त्यांची धार कमी होईल, असे विनोद शिरसाट यांनी सांगितले.
अवधूत तिंबलो म्हणाले की, दत्ता नायक हा मोठा माणूस आहे. पण, गोवा लहान आहे. दत्ता नायक नेहमीच गोव्यासाठी काहीतरी करायला हवे असे सांगतात ते आपणास करावे लागणार आहे. कोणत्याही विषयावर ठाम मत मांडायला ते मागेपुढे पाहत नाहीत. गोवा सध्या आर्थिक व राजकीयदृष्ट्या कुठे चाललाय याचाही विचार होण्याची गरज आहे, असे तिंबलो म्हणाले.
थरुर यांनी आपल्या भाषणात भारतातील विविध घटनांचा आढावा घेतला. भारताचा आतापर्यंतचा प्रवास व त्यातील नागरिकांचा प्रगतीसाठीचा हातभार व आलेल्या आव्हानांवर भाष्य केले.
माणसाला माणूस म्हणून स्वीकारणे गरजेचे
लोकांचा विरोध असतानाही लोकांसाठी त्रासदायक कायदे केले जात असून विविध मार्गांतून लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. हे बंद होण्यासाठी योग्य धोरणांची गरज आहे. धर्माच्या आधारावर दोन देश ही संकल्पना कुणालाही मान्य नाही. धर्म हा निकष कुठेही लावला जाऊ शकत नाही. हिंदू धर्मात सर्वांना एक मानले जाते. माणसाला माणूस म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे. भारताने लढलेल्या लढाईत सर्वधर्मीय जवानांनी प्राण अर्पण केले आहेत. सर्वधर्मीय एकत्र नांदतात हा भारत आहे. इतिहास बदलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होणे दुर्दैवी आहे. विविधतेत एकता जपणार्‍या देशात एक देव, एक धर्म व एक प्रार्थनापुस्तक ही संकल्पना रुजवणे शक्य नाही, असेही सांगतानाच भाजपच्या कार्यपद्धतीवर थरूर यांनी टीका केली.                         

हेही वाचा