सासष्टी : सोपो ठेकेदाराला मुख्याधिकार्‍यांकडून क्लिनचीट

कराची जादा आकारणी नाही : नगरसेवकांना योग्य माहिती नसल्याने प्रश्न उपस्थित

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
06th January, 01:05 pm
सासष्टी : सोपो ठेकेदाराला मुख्याधिकार्‍यांकडून क्लिनचीट

मडगाव : सोपो ठेकेदाराकडून दुकानाचा परवाना असलेल्या विक्रेत्यांकडून तसेच जादा कराची आकारणी केली जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी पालिका मंडळाच्या बैठकीत केला होता. याप्रकरणी मुख्याधिकारी मेलविन वाझ यांनी त्याचदिवशी चौकशी केलेली असून कोणत्याही प्रकारे कराची जादा आकारणी होत नसून नगरसेवकांना पूर्ण माहिती नसल्याने हा मुद्दा बैठकीत काढण्यात आल्याचे वाझ यांनी सांगितले. 

मडगाव पालिका मंडळाची बैठक शुक्रवार पार पडली या बैठकीत सोपो करावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी पालिकेकडून नव्याने सोपो निविदेव्दारे ज्या ठेकेदाराची नेमणूक करण्यात आलेली आहे, त्याच्याकडून परवाना असलेल्या दुकानदारांकडूनही सोपो कर घेतला जात आहे. नगरसेवक पूजा नाईक, राजू नाईक व इतरांनीही हा विषय लावून धरला होता. नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनीही काहीजणांनी आपणास सोपो कर कशासाठी घेतला जात असल्याचे कारण न देता पैसे घेतले जात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यावेळी मुख्याधिकारी मेलविन वाझ यांच्याकडून सोपो कर गोळा करण्यासाठी नेमणूक करणार्‍या ठेकेदाराला बोलावून या विषयांवर चर्चा करुन अटी व नियमांचे पालन करण्यास सांगण्यात येईल व नगरसेवकांनी केलेल्या आरोपांवरही विचारणा करण्यात येईल, असे सांगितलेले होते.

त्यानुसार मुख्याधिकारी मेलविन वाझ यांना विचारणा केली असता, नगरसेवकांनी जादा कर आकारणी केली जात असल्याच्या केलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारची सत्यता नाही असे सांगितले. ठेकेदाराला बोलावून चौकशी केली. पावत्यांबाबतही चौकशी करण्यात आलेली आहे पण कोणत्याही प्रकारे जादा कराची आकारणी किंवा चुकीची कर आकारणी आढळून आलेली नाही. नगरसेवकांना कदाचित या कराच्या आकारणीबाबत पूर्ण माहिती नसल्याने त्यांचा गैरसमज झाल्यानेच हा विषय पालिका मंडळाच्या बैठकीत काढण्यात आलेला असेल, असेही ते म्हणाले. आता मुख्याधिकार्‍यांनी सोपो ठेकेदाराला क्लिनचीट दिल्याचे दिसून येते. 

एसजीपीडीए मार्केटबाहेरील कर पालिकेचाच : मुख्याधिकारी

एसजीपीडीए मार्केटच्या संरक्षण भिंतीबाहेरील जागेवर पारंपरिक मासळी विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. ती जागा ही पालिका प्रशासनाच्या अखत्यारीत येते. यापूर्वी त्याठिकाणी मासळी विक्रीसाठी बसणार्‍या विक्रेत्यांकडून मडगाव पालिका कर्मचारीच सोपो वसूल करत होते. एसजीपीडीएचे कार्यक्षेत्र हे मार्केटमध्ये असून घाउक मासळी विक्रेत्यांकडून त्यांनी कर गोळा करावयाचा आहे. पोलिसांनाही मार्केटबाहेरील जागा ही पालिकेच्या ताब्यात येत असल्याचे सांगण्यात आलेले आहे, असेही मुख्याधिकारी मेलविन वाझ यांनी सांगितले.

हेही वाचा