गोवा | डिचोलीचे नगराध्यक्ष पुंडलिक उर्फ कुंदन फळारी यांचा राजीनामा

राजीनाम्यासाठी संबंधित गटाचा दबाव? डिचोलीच्या राजकारणात पुन्हा खळबळ

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th January, 12:36 pm
गोवा | डिचोलीचे नगराध्यक्ष पुंडलिक उर्फ कुंदन फळारी यांचा राजीनामा

डिचोलीः डिचोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी आज मंगळवारी (दि. ७ जानेवारी) सकाळी नगराध्यक्षपदाचा राजीनामा पणजी येथे नगरपालिका संचालनालयाकडे सुपूर्द केला. त्यामुळे आता डिचोलीच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. नगराध्यक्ष फळारी यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

९ डिसेंबर रोजी डिचोलीच्या 'नवा सोमवार' उत्सवादिवशीच ९ जणांच्या गटाने कुंदन फळारी यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावावर उपनगराध्यक्ष दीपा पळ, नगरसेवक अनिकेत चणेकर, निलेश टोपले, सतीश गावकर, तनुजा गावकर, दीपा शिरगावकर, अँड. रंजना वायंगणकर, अँड. अपर्णा फोगेरी व गुंजन कोरगावकर या नऊ नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

सत्ताधारी गटातील उपनगराध्यक्ष दीपा पळ, नगरसेवक निलेश टोपले व अँड. रंजना वायंगणकर या तीन जणांनी विरोधी गटाशी हातमिळवणी करत या अविश्वास ठरावाला बळ दिले होते. त्यामुळे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या गटात त्यांच्यासह नगरसेवक विजयकुमार नाटेकर, रियाझ बेग, सुदन गोवेकर व सुखदा तेली हे पाच जण राहिले होते.

या अविश्वास ठराव नाट्यात स्थानिक व राज्य पातळीवर भाजप पक्षाला विश्वासात न घेतल्याने अविश्वास ठराव आणणाऱ्या गटावर भाजप पक्षश्रेष्ठी तसेच मुख्यमंत्रीही नाराज झाले होते. त्याच अनुषंगाने अविश्वास ठराव मागे घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अविश्वास ठराव आणणाऱ्या गटाला केली होती.

त्यानंतर अविश्वास ठरावावर चर्चेसाठी बैठकीपूर्वी साखळी रवींद्र भवनात भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, डिचोलीतील पक्षाचे वरिष्ठ नेते वल्लभ साळकर, मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, कौस्तुभ पाटणेकर यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्वांमध्ये समेट घडवून आणण्यात आला होता. अविश्वास ठरावाला कोणीही न जाता तो बारगळावा असे ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणे अविश्वास ठराव बारगळण्यात आला होता.

राजीनामा देण्यासाठी दबाव?:-

अविश्वास ठराव बारगळल्यानंतर नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी राजीनामा द्यावा यासाठी मागणी धरून लावलेल्या गटाकडून नगराध्यक्षांवर पक्षाकडून राजीनाम्यासाठी दबाव आणण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे. पक्षाच्या सांगण्यावरून अविश्वास ठराव बारगळला होता. त्याबदल्यात नगराध्यक्ष फळारी यांचा राजीनामा घेण्याची मागणी या गटाकडून लावून धरण्यात आली होती. त्यानुसार नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा