एकाच मृतदेह हाती लागला असून अद्याप ८ जण अडकलेत. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू
दिसपुर : आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील उमरंगसो येथे ३०० फूट खोल कोळसा खाणीत अडकलेल्या नऊ कामगारांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ८ अजूनही अडकले आहेत. ६ जानेवारी रोजी कामगार खाणीतून कोळशाचे उत्खनन करत असताना हा अपघात झाला होता. अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी लष्करामर्फत एक पथक तैनात करण्यात आले आहे. काल मंगळवारी रात्री ही कारवाई थांबवण्यात आली. आज सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू झाले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमही मदत करत आहेत.
भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सचे पाणबुडे आणि वैद्यकीय पथकांसह 'इंजिनियर्स टास्क फोर्स' बचावकार्यात सामील झाले आहेत. कोल इंडियाचे एक तज्ज्ञ पथक आज बुधवारपासून बचावकार्यात सहकार्य करेल. ओएनजीसीने बचावासाठी अनेक पंप दिले आहेत. दरम्यान सद्यघडीस हाती आलेल्या वृत्तानुसार, सदर ठिकाण हे रॅट माइनर्सची खाण आहे. त्यात सध्या १०० फुटांपर्यंत पाणी भरले असून, दोन हाय कॅपेसिटी मोटर्सच्या मदतीने पाण्याचा उपसा केला जात आहे. पोलिसांनी खाण मालक पुनेश नुनिसा याला अटक केली आहे.
खाणीत अनेक मजूर अडकले असण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कोळसा उत्खनन सुरू असताना भुगर्भातून अचानक पाणी वर येऊ लागले. त्यामुळे कामगार खाणीतून बाहेर पडू शकले नाहीत. इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, स्थानिक अधिकारी आणि खाण तज्ज्ञांच्या टीमसह बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. खाणीत अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यात येत आहे.
रॅट होल मायनिंग म्हणजे काय?
यामध्ये डोंगराच्या बाजूने बारीक छिद्र पाडून खोदकाम सुरू केले जाते आणि आत जाण्यासाठी ठीकठाक जागा बनवल्यानंतर हळूहळू ड्रिलिंग मशीनने छिद्रं पाडली जातात. माती हातानेच बाहेर काढली जाते. कोळसा खाणकामात रॅट होल मायनिंग प्रक्रिया सामान्यतः वापरली जाते.
रॅट होल मायनिंग झारखंड, छत्तीसगड आणि प्रामुख्याने ईशान्य भागात होते, परंतु रॅट होल मायनिंग हे अतिशय धोकादायक काम आहे, म्हणून त्यावर अनेकदा बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने म्हणजेच एनजीटीने २०१४ मध्ये त्यावर बंदी घातली होती. तज्ज्ञांनी याला अवैज्ञानिक पद्धत म्हटले होते. तथापि, विशेष परिस्थितीत, म्हणजे बचाव कार्यात रॅट होल मायनिंग बंदी घालण्यात आलेली नाही.
२०१८ मध्ये मेघालयच्या पूर्व जैंतिया हिल्समध्ये असाच एक अपघात घडला होता. कोळसा खाणीत १५ मजूर अडकून मरण पावले. १३ डिसेंबर रोजी २० खाण कामगार ३७० फूट खोल खाणीत शिरले होते, त्यातील ५ कामगार खाणीत पाणी भरण्यापूर्वीच बाहेर आले होते. १५ मजुरांना मात्र वाचवता आले नाही.