अबब ! पहिल्या दिवशी डोक्याला खाज, दुसऱ्या दिवशी केसच हातात अन् तिसऱ्या दिवशी थेट टक्कल ?

महाराष्ट्राच्या बुलढाण्यात नवीन व्याधीने काढले डोके वर. अवघ्या तीन दिवसांत विचित्र कारणाने डोक्याचा चमनगोटा होत असल्याने सर्वजण भीतीने गळीतगात्र

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th January, 10:22 am
अबब ! पहिल्या दिवशी डोक्याला खाज, दुसऱ्या दिवशी केसच हातात अन् तिसऱ्या दिवशी थेट टक्कल ?

बुलढाणा : येथील बुलढाणा तालुक्यातील बोंडगाव, कालवड तसेच हिंगणा या गावात सध्या विचित्र कारणांमुळे उद्भवणाऱ्या केस गळतीच्या आजाराने थैमान घातले आहे.  अगोदर डोक्याला तीव्र खाज सुटणे, नंतर सरळसोट केसच हाती येणे आणि नंतर पूर्ण टक्कल पडणे असे याचे स्वरूप आहे. गेल्या १५-२० दिवसांत येथील अनेकजण या अज्ञात व्याधीचे बळी ठरत आहेत. विशेष म्हणजे पुरुष-महिलांसमवेत आबालवृद्ध देखील या व्याधीने त्रस्त झाले आहेत  

सदर प्रकार गेले १५-२० दिवस घडत आहे तरी येथील आरोग्य विभाग याबाबत अनभिज्ञ होता. त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांनी खासगीत उपचार घेतले. शाम्पूने असा प्रकार घडत असावा, असे त्वचारोग तज्ज्ञ आणि डॉक्टरांचे मत असले तरी कधीही आयुष्यात शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. समस्या नेमकी कशामुळे उद्भवली आहे याचा शोध घेणे सुरू आहे. 

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार बुलढण्यातील कालवड, बोंडगाव व हिंगणा या तीन गावांमध्ये ही केस गळतीची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. दरम्यान हे प्रकरण जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्फत थेट केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यापर्यंत पोहोचले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या गावांमध्ये सर्वेक्षण केले असून आतापर्यंत या व्याधीने ग्रस्त असे ५० हून अधिक तर पूर्णतः टक्कल पडलेले २४ पुरुष, ३ महिला आणि ३ मुले आढळून आली आहेत. गावातील सर्वांच्या विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. 

दरम्यान, डॉक्टरांचे एक पथक गावातील पाण्याचे स्त्रोत दूषित-बाधित आहेत का ? याचा देखील शोध घेत आहेत. मराठवाडा-खानदेश-विदर्भ या भागातील पाण्याचे जडत्व जास्त असते. याचाही परिणाम त्वचा आणि अंतर्गत आरोग्यावर बऱ्याचदा दिसून येतो. येथील पाण्याचे नमुने आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी धुळे येथील काही गावांतील पाणवठ्यांमध्ये शेतकामात खत म्हणून वापरले जाणारे नायट्रेट मिसळल्याने तेथील लोकांना पोटाचे विकार झाल्याचे समोर आले होते.  आता बुलढाण्यामध्येही असाच काहीसा प्रकार घडला असावा असा तर्क संबंधित अधिकारी व्यक्त करत आहेत. या अनुषंगाने येथील पाणवठ्यांमध्ये औषध फवारणीचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.  

हेही वाचा