रस्ते अपघात रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी गरजेची!

पियुष तेवारी : विचारवेध व्याख्यानमालेतील पहिले पुष्प

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15 hours ago
रस्ते अपघात रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी गरजेची!

मडगाव : रस्ते अपघात रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी होण्याची गरज आहे. मात्र, यांसह पोलिसांची कारवाई, योग्य धोरणे, रस्त्यांची योग्य बांधणी व देखभाल, वाहतुकीचे नियोजन व ट्रामा केअर या गोष्टीही रस्ते अपघात कमी करण्यासाठी आवश्यक आहे, असे मत सेव्ह गोवा फाउंडेशनचे सीईओ पियुष तेवारी यांनी सांगितले. अपघातांची राष्ट्रीय आकडेवारी पाहिल्यास गोवा टॉप टेनमध्ये असल्याने नियमांच्या कडक अंमलबजावणीवर लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
गोमंत विद्या निकेतन मडगाव गोवा यांच्यातर्फे ८ ते १२ जानेवारी या कालावधीत फोमेंतो पुरस्कृत विचारवेध व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. दरम्यान यावेळी दत्ता गोविंद पै रायतुरकर व्याख्यानात पियुष तेवारी यांचे ‘ड्रायव्हिंग चेंज : हाऊ यंग लिडर्स कॅन एंड द रोड क्रॅश इपिडेमिक’ या विषयावर व्याख्यान झाले.
रस्ता अपघाताच्या घटनेने दुखावलेला नाही किंवा नजीकच्या व्यक्तीचाही अपघात झालेला नाही, असा व्यक्ती मिळणे कठीण आहे. कुटुंबियांप्रमाणेच समाजाची सेवा करण्याचा हा प्रयत्न आहे. कॉम्प्युटर इंजिनिअर झाल्यावर कुटुंबाला मदत करण्यासाठी सुरुवातीला आपण नोकरी केली. पण, आपले लक्ष्य हे त्यापलीकडे काहीतरी करायचे होते. २००७ मध्ये चुलत भावाच्या अपघाती मृत्यूनंतर मनात कोलाहल माजले. दरवर्षी लाखो लोक रस्ते अपघातात मृत्यू पावतात व योग्यवेळी वैद्यकीय सुविधा मिळाल्यास अनेकांचे जीव वाचू शकतात, हे अभ्यासाअंती दिसून आले.
काही राज्यांत चुकीच्या रस्ते अभियांत्रिकीसाठी ‍ठेकेदार व अभियंत्यांवर गुन्हे नोंद होत आहेत. लोकांना समजण्यासारख्या भाषेत व चिन्हांमध्ये सूचना असाव्यात. रस्ता सुरक्षा नियमांची अंमलबजावणी गरजेचे आहे. दिल्लीतील एका अधिकार्‍याने रस्ते अपघात कमी करण्यासाठी लोकांना शिस्त लागावी यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी केली. मद्यपानासाठी जाणार्‍या व्यक्तीने गाडी घरीच सोडून जावी व मद्यपान करावी. चालकांना अटक करणे, वाहने जप्त करणे, नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर कारवाई करणे, ही कारवाई दररोज सुरू केली. यातून रस्ते अपघातातील मृत्यूंची संख्या कमी झाल्याचे तेवारी यांनी सांगितले.

राष्ट्रीय अपघातांची आकडेवारी पाहिली असता गोवा हे राज्य टॉप टेन राज्यामध्ये आहे. रस्ते सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी गरजेची आहे. गोव्यात पंचायत स्तरावर रस्ता सुरक्षा समिती आहे, हे चांगले लक्षण आहे. रस्त्यांची अभियांत्रिकी, देखभाल, वळणे ही देशातील अनेक भागातील रस्त्यांची समस्या आहे. - पियुष तेवारी, सीईओ, सेव्ह गोवा फाउंडेशन

हेही वाचा