अमेरिका : कॅलिफोर्नियात अग्नितांडव : लॉस एंजेलिसमध्ये कमला हॅरिसचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी

तब्बल ३० हजार घरे आगीत जळून खाक, सुमारे ३ लाख लोक बाधित. दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th January, 11:58 am
अमेरिका : कॅलिफोर्नियात अग्नितांडव : लॉस एंजेलिसमध्ये कमला हॅरिसचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी

वॉशिंग्टन : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेली आग शहरापर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत ४ हजार ८५६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आगीत सुमारे ११०० इमारती, सुमारे ३४५० कोंडो आणि स्टुडिओज् पूर्णपणे जळून खाक झाले असून एकूण ३० हजार घरांचे नुकसान झाले आहे.

आगीमुळे हवा विषारी झाली आहे. संरक्षणात्मक मुखवटे घालून अग्निशमन दल बाधित भागात पोहोचत आहेत.


वणव्यामुळे जंगलात पसरलेल्या आगीमुळे आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तर येत्या काळात हा आकडा वाढू शकतो. सुमारे ५० हजार लोकांना तात्काळ घरे सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सुमारे ३ लाख लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दीड लाख लोकांना स्वतः प्रशासनाने सुरक्षित स्थळी जाण्यास मदत केली आहे. तसेच या शहरात प्रशासनाने आणीबाणी जाहीर केली आहे.

लॉस एंजेलिसच्या टेकडीवर अनेक सेलिब्रिटींचे बंगले जळून राख झाले आहेत. आग अजूनही सुरूच आहे.


लॉस एंजेलिस शहरातील पॉश एरिया असलेल्या पॅलिसेड्समधील अनेक हॉलिवूड स्टार्सचे बंगले या आगीत जळून खाक झाले आहेत. मार्क हॅमिल, पॅरिस हिल्टन, जेमी ली कर्टिस, मँडी मूर, मारिया श्राइव्हर, ॲश्टन कुचर, जेम्स वूड्स आणि लीटन मीस्टर यांच्यासह अनेक हॉलीवूड स्टार्सच्या घरांना आग लागली. अनेक सेलिब्रिटींना जीव मुठीत घेऊन आपले घर सोडावे लागले आहे. आगीमुळे उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना लॉस एंजेलिसमधील ब्रेटनवूड भागातील त्यांचे घर रिकामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉस एंजेलिस ही अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला काउंटी आहे. येथे १ कोटीहून अधिक लोक राहतात. 


लॉस एंजेलिसमधील आगीत अनेक सामुदायिक केंद्रे आणि धार्मिक स्थळे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.


कॅलिफोर्नियात पसरलेल्या वणव्यावर हेलिकॉप्टर आणि विमानांच्या सहाय्याने नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र जोरदार वारे आणि आगीची दिशा सातत्याने  बदलल्याने आग वेगवेगळ्या ठिकाणी पसरत आहे. बचाव पथक हजारो लोकांना सुरक्षित स्थळी नेत आहे. शाळा, सामुदायिक केंद्रे आणि इतर सुरक्षित ठिकाणे आपत्कालीन निवारा म्हणून तयार करण्यात आली आहेत.


अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलात मंगळवारी आग लागली. बुधवारी, ते लॉस एंजेलिस शहरात पसरले, जिथे अनेक सेलिब्रिटींची घरे जाळली गेली. - दैनिक भास्कर


लॉस एंजेलिस , कॅलिफोर्निया हे शहर पर्वतांमध्ये वसलेले आहे. येथे पाइनची जंगले आहेत. सुकलेली डेरेदार झाडांची पाने एकमेकांना घासल्यामुळे सर्वप्रथम येथे वणवा पेटला आणि पुढे या वणव्याने रौद्रस्वरूप धरण केल्याने मंगळवारी आग सर्वत्र पसरू लागली. पुढच्या काही तासांत आगीने लॉस एंजेलिसच्या मोठ्या भागाला वेढले. शहरातील हवा सध्या प्रचंड विषारी झाली आहे.जंगलात आग लागल्यानंतर ताशी १६० किमी वेगाने वाहणाऱ्या 'सांता सना' वाऱ्यांनी आग वेगाने पुढे रेटवली. साधारणपणे शरद ऋतूत वाहणारे हे वारे खूप उष्ण असते. याचा सर्वाधिक परिणाम दक्षिण कॅलिफोर्नियावर होतो. वृत्तानुसार, वाऱ्याचा वेग अजूनही खूप जास्त आहे, त्यामुळे आग सतत पसरत आहे.


जंगले लॉस एंजेलिसच्या टेकडीच्या माथ्यावर पोहोचली. आगीमुळे टेकडी रात्री लाल दिसत होती.

हेही वाचा