सरकारसह गोव्याची बदनामी : प्रकरण श्रेष्ठीपर्यंत पोचणार
पणजी : सरकार तसेच गोव्याची बदनामी करण्यासाठी सरकारातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केल्याने मंत्रिमंडळात पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे. बदनामी करणारा हा मंत्री कोण? अशी विचारणा भाजप आमदार तसेच कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. हे प्रकरण श्रेष्ठींपर्यंत पोचणार असून ते बरेच गाजण्याची शक्यता आहे.
हे प्रकरण गंभीर आहे असे सांगतानाच पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मंत्र्याचे नाव सांगण्यास नकार दिला. रोहन खंवटे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. शिवाय त्यांच्या आरोपांना अन्य तीन मंत्र्यांनी दुजोरा दिल्याने हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे बनले आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली असली तरी फेरबदलाची चर्चा सुरूच आहे. राज्यातील पक्षाची संघटनात्मक निवडणूक आणि दिल्लीतील विधानसभा निवडणूक यामुळे सध्या तरी फेरबदल होणार नसल्याची काही जणांची अटकळ आहे. यात पुन्हा आता टूलकीट प्रकरण समोर आले आहे.
यंदा नववर्षाला राज्यातील किनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. पंचतारांकित हॉटेलांसह इतर हॉटेलातही ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात खोल्या भरल्या होत्या. सेंट फ्रान्सिस झेवियर शवदर्शन सोहळ्यामुळेही पर्यटकांचा आकडा वाढण्यास मदत झाली होती. तरीही राज्यातील हॉटेल्स रिकामी आहेत. नववर्षाला पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली आहे, अशा आशयाच्या पोस्ट समाजमाध्यमावर प्रसिद्ध होत होत्या. यामागे एका एजन्सीचा हात असल्याचा आरोप पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी जाहीरपणे केला होता. ही एजन्सी सोशल इन्फ्लूएंसरना पैसे देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. या एजन्सीवर कारवाई करण्यात येणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, आमदार डिलायला लोबो यांनीही एक एजन्सी गोव्याची बदनामी करत असल्याचा आरोप केला होता. नववर्षाची धूमधाम संपल्यानंतर रोहन खंवटे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. बदनामीमागे एका मंत्र्याचा हात असल्याचे सांगत त्यांनी कारवाईची मागणी केली. यापूर्वी एक एजन्सी बदनामी करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, यामागे मंत्री असल्याचा उल्लेख त्यांनी केला नव्हता.
मंत्री खंवटे यांच्या आरोपाला तीन मंत्र्यांचा दुजोरा
या प्रकरणाविषयी अधिक बोलण्यास मंत्री तसेच आमदारांनी नकार दिला आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या आरोपाला तीन मंत्र्यांनी दुजोरा दिल्याने हे प्रकरण निश्चितपणे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचणार आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून लॉबिंग सुरू असतानाच सदानंद शेट तानावडे हेच अध्यक्षपदी रहावेत, अशी मागणी काही मंत्र्यांकडून झालेली आहे. यात आता बदनामीचा आरोप एका मंत्र्यावर झाला असल्याने गुंतागुंत आणखी वाढली आहे.