जमीन फसवणूकप्रकरणी महिला नोटरीचा परवाना रद्द

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
जमीन फसवणूकप्रकरणी महिला नोटरीचा परवाना रद्द

पणजी : ‍जमीन फसवणूक प्रकरणात, न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या चौकशी अहवालात नाव असलेल्या बार्देश तालुक्यातील एका महिला नोटरीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, परवाना नूतनीकरणासाठी तिने केलेला अर्जही फेटाळण्यात आला आहे.
मधुमिता अवधूत नायक सलत्री यांच्याविरुद्ध जमीन हडप प्रकरणात स्थापन केलेल्या एसआयटीच्या पोलीस निरीक्षकांकडून तक्रारी आल्या आहेत. नोटरी सेवा प्रमुख आणि रजिस्ट्रार यांनी तक्रारीची चौकशी सुरू असतानाच तिच्याविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली. या चौकशीनंतर सदर नोटरी बनावट कागदपत्रे बनवून जमीन हस्तांतरण प्रकरणात सहभागी असल्याचे नोटरी सेवा प्रमुख आणि रजिस्ट्रार यांना आढळून आले. त्याचप्रमाणे, न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या अहवालात मधुमिता नायक सलत्री यांचे नावही होते. जमीन हस्तांतरण प्रकरणात त्यांनी बनावट सह्या असलेल्या प्रतिज्ञापत्रांवर सही केल्याचे उघड झाले आहे. यामुळे तिचा नोटरी परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, बार्देश तालुक्यासाठी ८ जुलै २०१४ रोजी तिला नोटरी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पाच वर्षांनंतर २०१९ मध्ये तिचा नोटरी परवाना नूतनीकरण करण्यात आला होता. ८ जुलै २०२४ रोजी परवान्याची मुदत संपल्यानंतर तिने पुन्हा नूतनीकरणासाठी अर्ज केला. नोटरी कायद्याच्या कलम १० अंतर्गत तिचा नोटरी म्हणून परवाना रद्द करण्यात आला आहे.