व्यावसायिकांत समाधान : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची झुंबड
कळंगुट किनारी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांनी केलेली गर्दी. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी देश-विदेशांतील पर्यटक गोव्याला पसंती देतात. यंदाही नाताळपासून नववर्षाच्या सुरुवातीपर्यंत मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात दाखल झाले. यंदा जुने गोवा येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांच्या दर्शनाचा सोहळाही असल्याने यासाठीही पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात आले. त्यामुळे किनारी भागांसह बहुतेक शहरांतील हॉटेल या काळात फुल्ल होती. समुद्र किनारे हाऊसफुल्ल झाले होते. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या विविध व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरवर्षीच नाताळ ते नववर्षाचे स्वागत या काळात गोव्यातील पर्यटन बहरत असते. पर्यटनाशी संबंधित सर्वच क्षेत्रांत मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने व्यावसायिकही खूश असतात. सोशल मीडियावर पर्यटकांनी गोव्याकडे पाठ केल्याचा अपप्रचार सुरू होता; प्रत्यक्षात मात्र सुमद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी केलेेली गर्दी हा दावा खोडून काढण्यास पुरेशी ठरली. ३० आणि ३१ डिसेंबर या दिवशी तब्बल २०० विमानांनी देशी पर्यटक गोव्याच्या विमानतळांवर उतरले, अशी माहिती स्कॉलचे व्यवस्थापन समितीचे तसेच पर्यटन मंडळाचे सदस्य अर्नस्ट डायस यांनी दिली. गाेव्यातील बहुतांश हॉटेलमधील खोल्यांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले होते. त्यामुळे ऐनवेळी आलेल्या पर्यटकांना खोल्या मिळवण्यासाठी फिरावे लागले. असे असतांनाही काही हॉटेल व्यावसायिकांनी यंदा व्यवसाय समाधानकारक झाला नसल्याची खंत व्यक्त केली आहे. याला तेच कारणीभूत आहेत. त्यांनी अव्वाच्या सव्वा दर लावल्याने पर्यटकांनी अन्य पर्याय शोधला असावा, असेही डायस पुढे म्हणाले.
विदेशी पर्यटकांनीही दिली गोव्याला पसंती
रशिया, यूके, पोलंड या देशांतून मोठ्या संख्येने पर्यटक नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात आले. ३० डिसेंबर रोजी पोलंडहून दोन विमाने भरून पर्यटकांनी गोवा गाठला. त्यांनी आधीच हॉटेलचे बुकिंग केले होते. तरीदेखील खोल्या कमी पडल्याने त्यांची अन्यत्र व्यवस्था करण्यात आली. गोव्याला देशी बरोबरच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचीही तितकीच गरज आहे, असेही अर्नस्ट डायस यांनी स्पष्ट केले.
मागील दोन आठवडे हॉटेलमधील खोल्या ९० टक्के फुल्ल
मागील दोन आठवडे हॉटेलमधील खोल्या ९० टक्के फुल्ल होत्या. सनबर्नचे आयोजन धारगळात झाले, तसेच कळंगुट परिसरात मोठ्या प्रवासी बस नेण्यास बंधने असल्यामुळे किनारी भागातील पर्यटकांची संख्या थोडी कमी झाली. ‘अ’, ‘ब’ श्रेणीतली लहान हॉटेल ८५ टक्के फुल्ल होती. थ्री आणि फोर स्टारवरील हॉटेल ६५ ते ७० टक्के फुल्ल होती. कोविडपूर्वीच्या काळाच्या तुलनेत विदेशी पर्यटकांची संख्या कमी होती. अर्थात हे चित्र पूर्ण भारतभरातच आहे, अशी माहिती टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखीजा यांनी दिली.