एचएमपीव्ही व्हायरसला घाबरण्याची गरज नाही :

डॉ. शेखर साळकर : बंगळूरू, गुजरातमध्ये लहान मुलांना लागण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th January, 12:14 am
एचएमपीव्ही व्हायरसला घाबरण्याची गरज नाही :

डिचोली : सध्या चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरस या श्वसनविषयक आजाराच्या विषाणूचा उद्रेक झाला असून भारतातही दोन रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. पुढील पंधरा दिवस यासंदर्भात कशाप्रकारे प्रादुर्भाव होतो, ते पहावे लागेल. त्यामुळे तूर्तास घाबरण्याची गरज नाही. मात्र सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. शेखर साळकर यांनी केले. 

बंगळूरू, गुजरातमध्ये लहान मुलांना लागण झाल्याने याबाबत काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या व्हायरसवर उपचार नाहीत. मात्र योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी एक विशेष तपासणी लागते. राज्यात ही सुविधा मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. या ठिकाणी २७ प्रकारच्या व्हायरसची माहिती उपलब्ध होते व एका तासातच निदान होते, असेही त्यांनी सांगितले. मात्र तूर्तास गोव्यातील जनतेला घाबरण्याची गरज नाही, असे डॉ. साळकर यांनी स्पष्ट केले.

डिचोली येथे पत्रकारांशी बोलताना डॉ. साळकर यांनी सांगितले की, विषाणूचा उद्रेक चीनमध्ये झालेला असला तरी भारतात सध्यातरी घाबरण्यासारखी स्थिती नाही. मात्र लहान मुलांना प्रादुर्भाव झाल्याच्या घटना घडल्याने विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
एचएमटीव्हीचा एकही रुग्ण गोवा व इतर बाजूच्या राज्यात आढळलेला नाही. तरीही या संसर्गाबाबत लोकांनी सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल, असे डॉ. साळकर यांनी स्पष्ट केले.