नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांना झटून काम करण्याचा सल्ला
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकार ज्या पद्धतीने संपूर्ण देशाचा विकास साधत आहे, त्याच पद्धतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा सरकार राज्यात दर्जेदार कामगिरी करत असल्याचे कौतुक भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी केले.
३६ मतदारसंघांतील नूतन मंडळ अध्यक्षांच्या गौरवासाठी प्रदेश भाजपकडून सोमवारी पणजीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर, दामू नाईक आदी यावेळी उपस्थित होते. निवडण्यात आलेले मंडळ अध्यक्ष हे जगातील सर्वांत मोठ्या पक्षाचे मंडळ अध्यक्ष आहेत, याचे भान ठेवून आगामी काळात त्यांनी काम करणे आवश्यक आहे. गोव्यातील भाजप सदस्यांच्या नोंदणीत यावेळी मोठी वाढ झाली आहे. पक्षाचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्षाच्या धोरणामुळे युवा नेतृत्वाला संधी : तानावडे
केंद्रीय नेतृत्वाने यावेळी मंडळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देशभर वयोमर्यादेची अट घातली होती. गोवा छोटे राज्य असल्याने त्यातून सूट मिळावी, अशी मागणी आम्ही पक्षाकडे केली होती; परंतु पक्षाच्या धोरणानुसारच निवड करण्याचे निश्चित झाले. त्यामुळे मंडळ अध्यक्षपदी युवा नेतृत्वाला संधी मिळाली आहे, असे सदानंद शेट तानावडे म्हणाले. अनेक मतदारसंघांत मंडळ अध्यक्षपदासाठी अनेकांची नावे होती. तरीही सर्वच मतदारसंघांत बिनविरोध निवडी करण्यात आल्या, असेही त्यांनी नमूद केले.