दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक
पणजी : ‘डिजिटल अरेस्ट’मुळे वृद्धेला तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून बार्देश तालुक्यातील एका वृद्ध महिलेला हा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने विजयवाडा येथील यरमला वेंकटेश्वरलू (५३) या दागिन्यांच्या दुकान मालकाला अटक केली आहे. त्याच्या बँक खात्यात जमा झालेले ४० लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे.
गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शिवोली - बार्देश येथील एका वृद्ध महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, २६ ते २८ डिसेंबर २०२४ रोजी अज्ञात व्यक्तीने तिच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप काॅल करून दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगत संपर्क साधला. त्याने तक्रारदाराच्या नावाने गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. तसेच तिच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगितले. याशिवाय तिच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे पत्र आल्याचे माहिती दिली. तसेच तिला हे प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँक खात्यात १ कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडले. या प्रकरणी सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास केला असता, एसएन पुरम-विजयवाडा येथील एका दागिन्यांच्या दुकानाच्या बँक खात्यात ४० लाख रुपये जमा झाल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, एएसपी अक्षत आयुश आणि उपअधीक्षक सूरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नवीन नाईक, कॉ. भालचंद्र नाईक आणि महेश नाईक या पथकाला विजयवाडा येथे पाठविण्यात आले. विजयवाडा येथे गेल्यानंतर पथकाने संशयित यरमला वेंकटेश्वरलू (५३) या बँकधारकाचा शोध लावला. त्याचा शोध लागल्यानंतर त्याला मंगळवारी गोव्यात आणून अटक केली आहे.
बँक अधिकाऱ्यांनी खाते गोठवले
विजयवाडा येथे गेल्यानंतर पथकाने संशयित यरमला वेंकटेश्वरलू याला अटक केली. त्याच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे पोलिसांना समजले होते. दरम्यान, संशयित यरमला याच्या बँक खात्यात संशयास्पदरित्या ४० लाख रुपये जमा झाल्याचे समजताच तेथील बँक अधिकाऱ्यांनी त्याचे खाते गोठविले.