चोर्ला घाटात कोसळला माल वाहतूक करणारा ट्रक

वाहनाचे ३० लाखांचे नुकसान : टायर फुटल्याने सुटले नियंत्रण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th January, 09:03 pm
चोर्ला घाटात कोसळला माल वाहतूक करणारा ट्रक

वाळपई : गोवा- बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरामध्ये शनिवारी रात्री रामू शेळके यांच्या मालकीचा मालवाहू ट्रक (जी. ए. ०४ टी ६४८३) कोसळल्यामुळे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर दहा लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले. प्रसंगावधान दाखवून चालकाने उडी घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला.

बेळगाव भागातून गोव्याकडे सदर मालवाहतूक करणारा ट्रक येत होता. चोर्ला घाट परिसरामध्ये गाडीचा एक टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी दरडीच्या दिशेने जाऊ लागली. गाडी दरडीत कोसळणार असल्याचे ओळखून चालकाने गाडीमधून ताबडतोब उडी घेतली. गाडी दरडीत कोसळली.

मालवाहू गाडीला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांच्या माहितीनुसार, सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. गाडीच्या दर्शनी व इतर भागाची मोठ्या प्रमाणात हानी झाली.

​वाळपई अग्निशामक दलाने घेतली धाव

वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. गाडीला लागलेली आग विझविण्यात त्यांना यश आले. मात्र, गाडीचे जवळपास ३० लाखांचे नुकसान झाले. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे हवालदार सतीश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक नाईक, कालिदास गावकर, गोकुळदास डेगवेकर यांनी सहाय्य केले.