पणजी : कोलवाळ कारागृहात तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करताना रंगेहात पकडलेल्या नवदीत पावणे या प्रोबेशनवरील पोलीस कॉन्स्टेबलला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. तुरूंग महानिरीक्षकांच्या अहवालानुसार याबाबतचा आदेश गोवा राखीव पोलीस व प्रशिक्षण विभागाच्या अधीक्षक सुचिता देसाई यांनी जारी केला आहे.
हा प्रकार दि. २९ डिसेंबर रोजी रात्री ८ वा. घडला होता. निलंबित पोलीस कॉन्स्टेबल हा सेवा बजावण्यासाठी कारागृहात जात होता. कारागृहातील प्रवेशद्वारावरील फ्रिस्किंग खोलीत त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी बुटाच्या शॉक्समध्ये लपवलेल्या तंबाखूच्या पुड्या आणि फिल्टर पेपर या तंबाखूजन्य वस्तू सापडल्या.
हा प्रकार फ्रिस्किंग खोलीतील आयआरबी पोलिसांनी आपल्या वरीष्ठांच्या निदशर्नास आणून दिल्यावर कारागृह प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. कारागृहाकडून अहवाल मिळाल्यानंतर तुरूंग महानिरीक्षकांनी पोलीस खात्याला हा अहवाल सादर केला. त्यानुसार, शुक्रवारी ३ रोजी पोलीस खात्याकडून कॉन्स्टेबल नवदीप पावणे याला सेवेतून निलंबित केले.
निलंबित कॉन्स्टेबल पावणे याचे दोन नातेवाईक हे कारागृहात सेवा बजावतात. ते तुरूंग प्रशासनाचे कर्मचारी आहेत. नवदीत हा मादक पदार्थ तस्करी करताना रंगेहात सापडला, तेव्हा हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न त्याच्या नातेवाईकांनी केला होता, अशी माहिती कारागृह सूत्रांकडून मिळाली आहे.
ड्रग्ज तस्करीचा केला होता प्रयत्न
निलंबित पोलीस कॉन्स्टेबल नवदीत पावणे याने यापूर्वीही ड्रग्ज व मोबाईलची कारागृहात तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याला सक्त समज देण्यात आली होती. त्यावेळी त्याच्या कारमध्येही प्रतिबंधित वस्तू सापडल्या होत्या. तरीही तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करण्याचा प्रकार त्याच्याकडून पुन्हा घडल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.