छत्रपती संभाजीनगर : ऑनर किलिंगने संभाजीनगर हादरले

बहिणीचे प्रेम प्रकरण सहन न झाल्याने चुलत भावाने उचलले टोकाचे पाऊल

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
07th January, 12:30 am
छत्रपती संभाजीनगर : ऑनर किलिंगने संभाजीनगर हादरले

छत्रपती संभाजीनगर : ऑनर किलिंगने छत्रपती संभाजी नगर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. १७ वर्षांच्या मुलीची २०० फूट डोंगरावरून खाली ढकलून हत्या करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्ख्या चुलत भावानेच तिला डोंगरावरून ढकलून दिले आहे. 

अंबड तालुक्यातील शहागडची मुलगी घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार शहागड पोलिसांना दिली होती. त्यानंतर घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते. 

बहिणीचे प्रेम प्रकरण सहन न झाल्याने एका चुलत भाऊ बहिणीला गोड बोलत डोंगरावर घेऊन गेला. त्यानंतर भावाने बहिणीला २०० फूट उंच डोंगरावरून ढकलून देत तिचा जीव घेतला. ही ऑनर किलिंगची घटना छत्रपती संभाजी नगर शहरातील साजापूर शिवारातील खवड्या डोंगर येथे घडली. 

नम्रता शेरकर असे १७ वर्षीय मृत मुलीचे नाव आहे. तर ऋषिकेश शेरकर असे आरोपी भावाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 
आंतरजातीय विवाहाने घेतलेला 'अमित'चाही बळी:
काही महिन्यांपूर्वी बालपणीच्या मैत्रिणीसोबत आंतरजातीय विवाह केलेल्या एका तरुणाची मुलीच्या घरच्यांनी हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधूनच समोर आली होती. अमित साळुंके असे हत्या केलेल्या तरुणाचे नाव असून भर रस्त्यात मुलीचे वडील गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाही यांनी अमितची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती.

जात आडवी आलीः 
दोघांनी घरच्यांचा विरोध झुगारून देऊन एप्रिल महिन्यात पळून जाऊन लग्न केले होते. विद्या ही बौद्ध समाजाची होती तर अमित गोंधळी समाजाचा होता. अमितच्या कुटुंबीयांनी मात्र दोघांच्या लग्नाला मान्यता दिली होती.

हेही वाचा