तिबेट केंद्रबिंदू, ७.१ रिश्टर स्केलची तीव्रता
नवी दिल्लीः मंगळवारी सकाळी नेपाळसह देशाचा उत्तर भाग भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. उत्तर प्रदेश, बिहारपासून दिल्लीपर्यंत लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ सीमेजवळील तिबेट असल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.१ इतकी नोंदवण्यात आली आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. तिबेटमधील झिझांग भाग हा या भूकंपाचे केंद्र होते. एएनआय या वृत्तसंस्थेने भूकंपाचे काही व्हिडिओ फुटेज जारी केले आहेत. त्यानुसार बिहारमधील शिवहरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या व्हिडिओमध्ये घरातील दिवे, पंखे हलतांना दिसत आहे.
पाच सेकंदापर्यंत जमीन हादरली. जमीन हादरल्याने साखर झोपेत असलेले नागरीक गडबडून घराबाहेर पळाले. भूकंपाचे केंद्र तिबेटमध्ये होते. त्याची तीव्रता रिश्टेर स्केलवर ७.१ इतकी नोंदवली गेली. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वेनुसार, नेपाळ आणि भारतातील सिक्कीमच्या सीमावर्ती भागात सकाळी भूकंपाचे हादरे जाणवले.
बिहारपर्यंत भूकंपाचे हादरे
या भूकंपाने तिबेट, नेपाळ, सिक्कीमच नाही तर बिहारपर्यंत प्रभाव दाखवला. बिहारमधील मोतीहारी, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पुर्णिया, सिवान, अररिया, सुपौल आणि मुजफ्फरपूरमध्ये सकाळी ६.३५ वाजता भूकंप जाणवला. माल्दासह उत्तर बंगालमधील काही भागात पहाटे जमीन हादरल्याने अनेक जण घराच्या बाहरे आले.
नेपाळमध्ये २० दिवसांत आठ भूकंप
या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. एनएसआरसीच्या नोंदीनुसार, नेपाळमध्ये ३ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचा हा नववा भूकंप होता, त्यापैकी आठ भूकंप पश्चिम नेपाळमध्ये गेल्या २० दिवसांत झाले आहेत.