त्वचेवर फोड, तोंडात व्रण तसेच घसा खवखवणे ही लक्षणे असल्याचा दावा
नवी दिल्लीःएकीककडे चीनमधून ह्यूमन मेटान्यूमोवायरस मोठ्या प्रमाणावर पसरत असताना दुसरीकडे, अमेरिकेत ‘रॅबिट फीवर’ म्हणजेच टुलारेमिया या दुर्मिळ आजाराचे रुग्ण वाढत असल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकन रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या अहवालानुसार, गेल्या दहा वर्षांत या आजाराच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हा आजार फ्रॅन्सिसेला टुलारेन्सिस नावाच्या जीवाणूमुळे होतो.
अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत अमेरिकेत रॅबिट फीवर ग्रस्त लोकांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, २०११ ते २०२२ दरम्यान ट्यूलरेमिया संसर्गाची प्रकरणे ५६ टक्क्यांनी वाढली आहेत.
'असा' पसरतो आजार:-
साइन्स अलर्टने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, हा आजार वेगवेगळ्या मार्गांनी पसरतो. संक्रमित टिक, डियर फ्लायच्या चाव्यांमुळे, तसेच संक्रमित प्राणी जसे की ससा किंवा उंदरांच्या थेट संपर्काने हा आजार होतो. याशिवाय, संक्रमित प्राण्यांच्या घरट्यांमध्ये किंवा गवतावर असलेल्या जीवाणूंमुळे गवत कापणाऱ्या व्यक्तींना देखील हा आजार होऊ शकतो. तसेच दूषित पाणी प्यायल्याने आणि शेतीतील धूळ श्वसनासोबत फुफ्फुसांमध्ये गेल्याने घेतल्याने देखील संसर्ग होऊ शकतो.
कोणत्या वयोगटातील व्यक्तींना धोका?
हा आजार मुख्यतः ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये तसेच ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये दिसून येतो.
अशी आहेत ‘रॅबिट फीवर’ची लक्षणेः-
ट्यूलरेमियाची तीव्रता भिन्न असू शकते, परंतु ताप हे सर्व प्रकारांमध्ये एक सामान्य लक्षण आहे. काही लोकांना त्वचेवर फोड, तोंडात व्रण तसेच घसा खवखवणे अशी लक्षणे देखील असू शकतात. तसेच काहींमध्ये डोळ्यांची जळजळ होणे, सूज येणे ही लक्षणे असल्याचाही दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.