दिल्ली : व्ही नारायणन यांची इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती; दोन वर्षांचा असेल कार्यकाळ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th January, 12:48 pm
दिल्ली : व्ही नारायणन यांची इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती; दोन वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ व्ही नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यासोबतच त्यांना अंतराळ विभागाचे सचिवही करण्यात आले आहे. नारायणन हे १४ जानेवारीला एस सोमनाथ यांची जागा घेतील. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. नारायणन सध्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर (LPSC), वालियामालाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. नारायणन हे रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट तंत्रज्ञानातील तज्ज्ञ मानले जातात. 

 व्ही नारायणन यांनी १९८४ मध्ये इस्रोमध्ये रुजू झाले . याआधी व्ही नारायणन यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये (VSSC) साडेचार वर्षे काम केले होते. व्हीएसएससीमध्ये नारायणन यांनी साउंडिंग रॉकेट्स, एएसएलव्ही आणि पीएसएलव्ही सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले. १९८९ मध्ये त्यांनी आयआयटी खरगपूरमधून क्रायोजेनिक इंजिनीअरिंगमध्ये एम.टेक केले. यानंतर नारायणन एलपीएससीमध्ये रुजू झाले. नारायणन यांनी एलपीएससीमध्ये काम करत असताना १८३ लिक्विड प्रोपल्शन सिस्टम आणि कंट्रोल पॉवर प्लांट्सची निर्मिती केली.  

नारायणन यांनी देशासाठी अनेक अवकाश प्रक्षेपण वाहने बनवण्यात मदत केली आहे. GSLV Mk-III चा C25 क्रायोजेनिक प्रकल्प नारायणन यांच्या देखरेखीखालीच पूर्ण झाला. यासोबतच पीएसएलव्हीचा दुसरा आणि चौथा टप्पा विकसित करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नारायणन यांनी चांद्रयान-२, चांद्रयान-३, आदित्य स्पेसक्राफ्ट आणि GSLV Mk-III मोहिमांसाठीच्या जवळपास ९८ टक्के प्रणोदन प्रणाली विकसित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नारायणन यांच्या नेतृत्वाखालील टीमने इस्रोच्या अनेक महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या.  

नारायणन यांनी शैक्षणिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नारायणन यांना आयआयटी खरगपूर कडून सिल्व्हर मेडल, Astronautical Society of India (ASI) कडून गोल्ड मेडल आणि नॅशनल डिझाईन अवॉर्ड यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. नारायणन यांनी भारतीय अवकाश संशोधनाला नव्या उंचीवर नेण्यास मदत केली आहे. त्यामुळेच आता केंद्र सरकारने त्यांना देशाच्या अंतराळ संस्थेचे प्रमुख बनवले आहे. 

एस सोमनाथ हे १४  जानेवारी २०२२ रोजी इस्रोच्या प्रमुखपदी रुजू झाले होते. त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात एस सोमनाथ इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ यशस्वीपणे उतरवले. यासोबतच आदित्य-एल१  मिशन देखील यशस्वीरीत्या पार पाडले होते. मात्र, गेल्या वर्षी मार्चमध्ये एस सोमनाथ आपल्याला कॅन्सर झाल्याची माहिती शेअर केली होती. एस सोमनाथ यांच्यानंतर इस्रोला पुढे नेण्याची जबाबदारी आता व्ही नारायणन यांच्या खांद्यावर असेल. 


हेही वाचा