पणजी : गेल्या महिन्यात डिसेंबर २०२४ मध्ये समुद्रात बुडणाऱ्या ३० जणांना वाचवण्यात आले होते. तर, एकाचा बुडून मृत्यू झाला. बहुतांश घटना कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर घडल्या असून २१ जणांना वाचवण्यात आले आणि एकाचा मृत्यू झाला, असे जीवरक्षक संस्था दृष्टीने सांगितले.
दृष्टीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये कळंगुट येथे २० पर्यटकांना बुडण्यापासून वाचवण्यात आले. हे सर्व पर्यटक बोटीत प्रवास करत असताना त्यांची बोट उलटली. या बोटीतील सर्व प्रवाशांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले. ५४ वर्षीय पर्यटकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत मध्य प्रदेशातील एका ३२ वर्षीय पर्यटकाला जीवरक्षकांनी समुद्रातून सुखरूप बाहेर काढले.
कांदोळी येथे तीन रशियन पर्यटकांना बुडण्यापासून वाचवण्यात आले. ३० ते ४० वयोगटातील तीन महिला पोहताना समुद्रात बुडाल्या होत्या. त्यांना जीवरक्षकांनी सुखरूप बाहेर काढले.
बाणावली येथे बुडण्याच्या घटनेत दोन रशियन पर्यटकांना वाचवण्यात आले. ५१ आणि ५२ वयोगटातील दोन महिलांना जीवरक्षकांनी वाचविले.
बागा समुद्रकिनाऱ्यावर ३ जणांना बुडण्यापासून वाचविण्यात आले. एका घटनेत, दोन रशियन महिला आणि एक पुरुष यांना वाचविण्यात आले. दुसऱ्या एका घटनेत, एक ३३ वर्षीय व्यक्ती मित्रासोबत समुद्रात गेला होता पण लाटांमुळे बाहेर पडू शकला नाही. जीवरक्षकांनी त्याला बाहेर काढले.
बेताळ भाटी समुद्रकिनारी बुडणाऱ्या एका पर्यटकाला जीवरक्षकांना वाचवण्यात यश आले. त्यात समुद्रात अडकलेल्या राजस्थानमधील २१ वर्षीय पर्यटकाचा समावेश आहे.
दरम्यान, दृष्टी जीवरक्षकांनी बेपत्ता तीन मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घालून दिली. कुत्र्यांनी चावा घेतलेल्या आणि समुद्रात जखमी झालेल्या प्रत्येक पर्यटकावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
बाणावली समुद्रकिनारी एका शॅकमध्ये जाताना कर्नाटकातील पर्यटकांवर तीन भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. जखमी पर्यटकांना जीवरक्षकांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी पाठवले. बाणावली किनारी एक रशियन पर्यटक जलक्रीडा कर्मचाऱ्यांना मदत करत होता. यावेळी त्याचा पाय कापून जखमी झाला. जीवरक्षकांनी प्राथमिक उपचार करुन त्याला रुग्णालयात पाठवले.
बेपत्ता मुले पालकांकडे केली सुपूर्द
कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या ५ आणि ११ वर्षांच्या छत्तीसगडच्या दोन मुलांना शोधून त्यांच्या पालकांकडे परत करण्यात जीवरक्षकांना यश आले आहे. कर्नाटकातील हुबळी येथील कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेला ८ वर्षांचा मुलगाही सापडला असून तो त्याच्या पालकांकडे सुपुर्द करण्यात आला आहे.