तिन्ही समुद्रकिनाऱ्यावरील २३६ शॅकना फटका
म्हापसा : कळंगुट, कांदोळी व मांद्रे समुद्रकिनार्यांवर शॅक कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांना मारहाण होण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनानंतर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत या पट्ट्यातील सर्व शॅक बंद करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशाची अमलबजावणी पर्यटक पोलीस करीत असून तिन्ही समुद्रकिनाऱ्यावरील एकूण २३६ शॅकना याचा फटका बसला आहे.
आमच्याकडे रात्री १ वाजेपर्यंत शॅक खुले ठेवण्याची परवानगी असताना पोलिसांकडून ही जबरदस्ती का, असा प्रश्न शॅक मालक संघटनेने उपस्थित केला आहे. तर, शॅक धोरणानुसारच आम्ही कार्यवाही करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
कळंगुट समुद्रकिनारी काही दिवसांपूर्वी शॅकवाल्यांकडून पर्यटकांवर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात एका पर्यटकाचा जीव गेला. तर, एक गंभीर जखमी झाला होता. तसेच मांद्रे आणि कांदोळी समुद्रकिनारील शॅकमध्ये पर्यटकांना मारहाणीचे प्रकार घडले होते. या प्रकरणानंतर पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी या तिन्ही किनाऱ्यावरील शॅक रात्री ११ पर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, स्थानिक आमदारांच्या विनंतीवरुन शॅक बंद करण्याची मुदत रात्री १२ पर्यंत लांबवण्यात आली आहे. हा नियम राज्यातील सर्वच समुद्रकिनारी असलेल्या शॅकना लागू आहे. मात्र, वरील तिन्ही समुद्रकिनाऱ्यावरील शॅक बंद करण्याची सक्तीची कार्यवाही पर्यटक पोलिसांवर सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, शॅकवरील संगीत हे रात्री १० पर्यंत बंद होते. त्यानंतर शॅक रात्रीचे अकरापर्यंत खुले असतात. यासाठी पर्यटन खात्याने परवानगी दिली आहे. तर, मध्यरात्री १ पर्यंत दारू विकण्यासंबंधीचा परवाना अबकारी खात्याने दिलेला आहे. शॅक धोरणानुसार संबंधित खात्यांकडून हे परवाने दिले जातात. तरीही मध्यरात्री १२ पर्यंत शॅक बंद करण्याची सक्ती अन्यायकारी असल्याचे शॅकमालकांनी म्हटले आहे.
सरकारने तोडगा काढावा : जॉन लोबो
पर्यटन आणि अबकारी खात्याचा परवान्यानुसार आम्ही रात्री १ वाजेपर्यंत शॅकचा व्यवसाय करतो. मात्र, आता अचानक ११ वा. शॅक बंद करण्याची कारवाई पोलिसांकडून केली जाते. एक-दोन घटनांमुळे सरसकट सर्व शॅक व्यावसायिकांना लक्ष्य करणे चुकीचे आहे. राज्य सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणी गोवा शॅक मालक कल्याण सोसायटीचे सरचिटणीस जॉन लोबो यांनी केली आहे.
मध्यरात्री किनाऱ्यावर दारू प्राशन नको!
समुद्रकिनारी हल्लीच्या काळात पर्यटकांना मारहाणीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शॅक मध्यरात्री बंद झाल्यानंतर किनारी भागात कुणीही फेरफटका किंवा दारू प्राशन करणार नाही, याची दक्षता पर्यटक पोलिसांकडून घेतली जात आहे.