मोबाईल, सोनसाखळी, दहा हजार रुपये घेऊन दोघे कारने पसार
वास्को : कुठ्ठाळी येथील विजयन थोट्टारयथ यांची कार अडवून त्यांना लोखंडी कांबीने मारहाण केल्यावर त्यांचा मोबाईल, गळ्यातील सोनसाखळी व रोख दहा हजार रुपये घेऊन आपल्या कारने पळ काढणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींविरोधात वेर्णा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सदर घटना व्यवसायातील वैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे केरळचे पण सध्या कुठ्ठाळी येथे राहणारे विजयन हे ८ जानेवारीला सव्वा पाचच्या दरम्यान आपल्या ईको कारने मडगावला चालले होते. ते सतांत्र कुठ्ठाळी येथे एका गॅरेजजवळ पोहचले असता एका इनोव्हा कारचालकाने आपली कार चुकीच्या दिशेने त्यांच्या कारच्यासमोर आडवी घातली. त्यानंतर त्या कारमधून तोंडावर मास्क घातलेला, हाफ पँट व टी शर्ट परिधान केलेला एक युवक उतरला. त्याच्या हातात लोखंडी पाईप होता. त्याने विजयनच्या कारच्या पुढील काचेवर लोखंडी पाईप मारून काच फोडली. त्याच्यासमवेत असलेला दुसराही हातात लोखंडी पाईप घेऊन तेथे आला. त्यानेही आपला चेहरा मास्कने झाकला होता. त्याने हाफ पँट व टी शर्ट घातले होते. त्यानंतर त्या दोघांनी विजयनला लोखंडी पाईपने मारहाण करण्यास आरंभ केला. त्याच्या उजव्या मांडीवर, उजव्या मनगटावर तसेच डोक्यावर लोखंडी पाईप मारल्याने ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी विजयन याच्याकडील सॅमसन मोबाईल हँडसेट, दहा हजार रुपये रोख, सोनसाखळी असा सुमारे दोन लाखांचा ऐवज काढून घेतला. ते दोघेजण वीस ते तीस वर्षे वयोगटातील आहेत. याप्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र नाईक पुढील तपास करीत आहेत.