न्यायालयाकडून पोलीस महासंचालकांसह इतर प्रतिवादींना नोटीस
पणजी : गोवा पोलिसांनी प्रोबेशनवर असलेला विशाल मडगावकर या पोलीस कॉस्टेबलला (व्हायरलेस मेसेंजर) सेवेतून बडतर्फ केले होते. या आदेशाला मडगावकर याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणी न्यायालयाने पोलीस महासंचालकांसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ रोजी होणार आहे.
या याचिकेत विशाल मडगावकर याने राज्य सरकार, मुख्यालयाचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस महासंचालकांना प्रतिवादी केले आहे. मडगावकर २०२३ मध्ये पोलीस खात्यात कॉस्टेबल (व्हायरलेस मेसेंजर) म्हणून रुजू झाले होते. त्याने पोलीस खात्यात बजावलेल्या कालावधीत त्याची सेवा चांगली अाहे. तसेच त्याला जारी करण्यात आलेल्या बडतर्फीच्या आदेशात कोणतेही कारण स्पष्ट करण्यात आले नसल्याचा दावा त्याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या प्रकरणी बुधवार, दि. ८ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पोलीस महासंचालकांसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून त्यांना बाजू मांडण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ रोजी ठेवण्यात आली आहे.
महिलेची विशाल विरोधात तक्रार
बडतर्फ पोलीस कॉन्स्टेबल विशाल मडगावकर याच्या विरोधात वास्को येथील एका महिलेने पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली. त्यात नोकरीचे आमिष दाखवून ४ लाख रुपयांची फसवणूक तसेच गैरव्यवहार, धमकी आणि गुन्हेगारी क्रियाकलापचा आरोप महिलेने तक्रारीत केला होता. तसेच इतर मुद्दे उपस्थित केले होते. तक्रारीची दखल घेऊन तसेच मडगावकर याने त्याला न्यायालयाकडून दंडनीय शिक्षा झाल्याची माहिती लपवून फसवणूक केल्याचा ठपका ठेवून पोलीस मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी बडतर्फची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती समोर आली आहे.