पोलीस महासंचालक, अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक पद मंजूर
पणजी : केंद्र सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने गोव्यात अॅग्मू केडरच्या भारतीय पोलीस सेवेची (आयपीएस) पदे आठवरून दहा केली आहेत. याशिवाय पोलीस महासंचालक (डीजीपी) पद आणि अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक पद मंजूर केले आहे. याबाबतची अधिसूचना मंत्रालयाचे अव्वल सचिव कुलदीप चौधरी यांनी जारी केली आहे.
जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, गोव्यासाठी पोलीस महासंचालक आणि अमली पदार्थ विरोधी पथक अधीक्षक पद मंजूर केले आहे. त्यानुसार, यापूर्वी गोव्यासाठी आठ आयपीएस पदे मंजूर करण्यात आली होती. आता त्यात वरील दोन पदे वाढवण्यात आली. त्यामुळे गोव्यात १० आयपीएस अधिकारी कार्यरत राहणार आहेत. त्यात वरील दोन पदांसह अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, दोन उपमहानिरीक्षक (रेंज) व (सीआयडी / गुप्तहेर) आणि चार अधीक्षक पदे मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार, दोन्ही जिल्हा अधीक्षक, सीआयडी / गुन्हा शाखा आणि प्रशिक्षण / वाहतूक पोलीस अशी चार अधीक्षक पदे मंजूर केली होती. आता त्यात वाढ करून अमली पदार्थ विरोधी पद मंजूर करण्यात आले आहे.
राज्यात पोलीस महासंचालक अलोक कुमार, महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई, उपमहानिरीक्षक (मुख्यालय) अजय कृष्णन शर्मा आणि उपमहानिरीक्षक (रेंज) वर्षा शर्मा, गुन्हा शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता, उत्तर गोवा अधीक्षक अक्षत कौशल, आर्थिक गुन्हा विभागाचे (ईओसी) अर्शी अादिल आणि अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एएनसी) अधीक्षक टिकम सिंग वर्मा हे आयपीएस अधिकारी गोव्यात कार्यरत आहेत. याशिवाय गोवा पोलीस सेवेतून आयपीएस झालेले विश्राम बोरकर हे गोव्यात कार्यरत आहेत. याशिवाय तीन प्रशिक्षणार्थी अधिकारी गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावत आहेत.