मोबाईलचा स्फोट झाल्याने आग लागल्याचा अंदाज
म्हापसा : भुतकीवाडा, सुकूर पर्वरी येथील ईशा अपार्टमेंटमधील एका फ्लॅटला आग लागून मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीत सुमारे ४ लाखांचे नुकसान झाले.
ही घटना गुरुवारी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास घडली. ईशा अपार्टमेंट या दुमजली इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील अॅन लोबो यांच्या मालकीच्या फ्लॅटला ही आग लागली. फ्लॅटमध्ये मुकेश ठाकूर हे भाडेकरू म्हणून वास्तव्यास होते. दुपारी दीडच्या सुमारास ठाकूर यांची पत्नी फ्लॅट बंद करून बाहेर गेल्या होत्या. त्यांनी हॉलमध्ये मोबाईल फोन चार्जिंगला लावला होता. ओव्हर चार्जिंगमुळे या फोनचा स्फोट झाल्याने ही आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
पर्वरी अग्निशमन अधिकारी दामोदर पेडणेकर, ओंकार कारबोटकर, सलिम शेख, लक्ष्मण परवार, विजय गावस, उत्तम कामत, नेहाल गोवेकर, प्रज्योत होबळे तसेच म्हापसा अग्निशमन दलाचे हवालदार सूरज शेटगावकर, नितीन चोडणकर, प्रवीण पिसुर्लेकर, विष्णू केसरकर, सिद्धेश शेट व गिरीश गावस या जवानांनी ही आग नियंत्रणात आणली.
गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने दुर्घटना टळली
आगीत फ्लॅटमधील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, यासारखी वीज उपकरणे, कपडे, फर्निचर आणि इतर वस्तू जळाल्या. तर, कपाटातील दागिन्यांसह घरातील एका कुत्र्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले. दलाच्या जवानांनी प्रसंगावधाने फ्लॅटमधील दोन्ही गॅस सिलिंडर प्रथम बाहेर काढले. त्यामुळे मोठी हानी टळली.