जुने गोवा पोलिसांनी तिसऱ्यांदा घेतली माहिती
पणजी : जमीन हडप प्रकरणातील संशयित सिद्दिकी खान यांनी जारी केलेल्या व्हिडिओ प्रकरणात आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांची जुने गोवा पोलिसांनी तिसऱ्यांदा चौकशी केली आहे. पालेकर यांची पोलिसांनी बुधवारी सकाळी दीड तास चौकशी केली.
जमीन हडप प्रकरणातील संशयित सिद्दिकी खान मागील चार वर्षांपासून फरार होता. गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) संशयित सिद्दिकीला १२ नोव्हेंबर २०२४ रोजी हुबळीमधून अटक करुन गोव्यात आणले होते. त्यानंतर सिद्दिकीने १३ डिसेंबर २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हा शाखेच्या कोठडीतून पलायन केले होते. सिद्दिकीने पलायन करण्यासाठी आयआरबी कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक याची मदत घेतली होती. पलायनानंतर गुन्हा शाखेच्या पथकाने एर्नाकुलम-केरळ पोलिसांच्या मदतीने सिद्दिकीला २१ डिसेंबर २०२४ रोजी अटक केली होती. फरार असताना सिद्दिकीने एक व्हिडिओ जारी केला होता. व्हिडिओमध्ये त्याने पोलिसांनी त्याला एन्काउंटर करण्याची धमकी देऊन हुबळी येथे आणून सोडल्याचा आरोप केला होता. या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह अॅड. अमित पालेकर यांना मिळाला होता. त्यानंतर सुनील कवठणकर यांनी तो प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवला होता. या व्हिडिओ प्रकरणात अॅड. अमित पालेकर यांची जुने गोवा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी अॅड. पालेकर यांची २३ डिसेंबर रोजी प्रथम चौकशी केली.
दरम्यान, कॉन्स्टेबल अमित नाईकशी मैत्री करुन त्याच्या मदतीने पलायन केल्याची कबुलीही त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून दिली होती. या घटनेनंतर अॅड. पालेकर यांना २४ डिसेंबर रोजी पुन्हा पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी जुने गोवा पोलिसांनी अॅड. पालकेर यांना तिसऱ्यांदा पाचारण करुन त्याची दीड तास चौकशी केली आहे.
सिद्दिकीने घेतले होते पालेकरांचे नाव
२३ डिसेंबर रोजी सकाळी सिद्दिकी खानचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर पुन्हा व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत सिद्दिकीने अॅड. अमित पालेकर याने आपल्याला सत्ताधारी राजकारण्यांची नावे घेऊन व्हिडिओ करण्यास सांगितले. नंतर ते आपल्याला हवे तसे एडीट करुन व्हायरल केल्याचे म्हटले होते.