वास्को येथील ‘एटीएफ’ तस्करीप्रकरणी आठ जणांना सशर्त जामीन मंजूर

सीबीआयने केली होती अटक : एकूण १२ जणांना झाली होती अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th January, 12:04 am
वास्को येथील ‘एटीएफ’ तस्करीप्रकरणी आठ जणांना सशर्त जामीन मंजूर

पणजी : केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने डिसेंबर २०२४ मध्ये वास्को येथील गांधीनगर-वरुणापुरी येथे छापेमारी करून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तेल साठ्यातून विमानात वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (एटीएफ) तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या आणखी आठ जणांना मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केले आहे.
गांधीनगर-वरुणापुरी येथे एटीएफ या ज्वलनशील पदार्थाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानुसार सीबीआयचे अतिरिक्त अधीक्षक टी. संतोष कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक स्नेहा सहानी, संजीवन नाईक, अपर्णा चोडणकर व इतर पथकाने १२ डिसेंबर रोजी दु. ३.३० ते रात्री ११.३० दरम्यान वास्को येथील गांधीनगर-वरुणापुरी येथील मुख्य रस्त्यावर छापेमारी केली होती. या प्रकरणी सीबीआयने चार जणांना अटक केली होती.
या प्रकरणी सीबीआयने वरील संशयितांची कसून चौकशी केली असता, यात आणखी संशयितांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार, सीबीआयने प्रकाश चव्हाण, राजेंद्र, मंजुनाथ मदार, रोहित सातीहल, संतोष कुमार, लालसाहेब सिंग, उमेश पटेल आणि सुजीत कुमार पटेल या आठ जणांना अटक केली. तसेच एटीएफची तस्करी करण्यासाठी वापरलेले चार टँकर जप्त केले होते.
दरम्यान वरील चार जणांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. याच दरम्यान वरील आठ जणांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर या संशयितांनी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयित न्यायालयीन कोठडीत असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयितांना प्रत्येकी ५० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केले आहे.
संशयिताकडून टर्बाइनसह दोन वाहने जप्त
सीबीआयने मुख्य संशयित विठ्ठल चव्हाणसह मंतेश पवार, महेंदर पास्सी, मैनुद्दीन शेख या चार जणांना अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून २.७५ लाख रुपये किमतीचे ३ हजार लिटर एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ)सह संशयिताकडून वापरण्यात आलेली दोन वाहने जप्त करण्यात आली होती.