आगशी अपघात प्रकरण : थार-दुचाकीच्या धडकेत वडिलांचा झाला होता मृत्यू
पणजी : आगशी बाजार परिसरात रविवारी (दि.२९) थार जीप आणि दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला होता. यातील दुचाकी चालक राजेश देविदास नाईक (३९, वरुणापुरी-वास्को) याचा मृत्यू झाला होता. आता त्याची तीन वर्षीय मुलीचा गोमेकाॅत उपचाऱ्यादरम्यान मृत्यू झाला आहे.
आगशी बाजार परिसरात रविवार २९ डिसेंबर २०२४ रोजी सायं. ६ वा. थार जीप आणि दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला होता. त्यावेळी थार जीपच्या खाली दोन दुचाकी सापडल्या होत्या. तिथे जमा झालेल्या नागरिकांनी जीपच्या खाली सापडलेल्या दुचाकी चालक राजेश नाईक, त्याची पत्नी आणि त्यांच्या तीन वर्षीय मुलीला बाहेर काढलेे. या अपघातात राजेश नाईक जागीच मृत्यू झाल्याचे १०८ रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी घोषित केले होते. तर त्याची पत्नी आणि मुलीला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल केले होते. तिथे उपचार सुरू असताना रविवार ५ जानेवारी रोजी सायंकाळी राजेश नाईक याच्या तीन वर्षीय मुलीचे निधन झाले आहे.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर आगशीचे पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील मुळगावकर यांनी पंचनामा केला. तर उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर यांनी थार जीप चालक विल्सन आरावजो (सांताक्रूझ) याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक केली होती.
संशयिताच्या जामिनावर ९ रोजी सुनावणी
या अपघातातील अटक केलेल्या संशयित आरावजोला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी रवानगी केली आहे. दरम्यान, थार जीप चालक विल्सन आरावजो याने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जानेवारी रोजी होणार आहे.