म्हापशातील हॉस ऑफ कॅफीनमध्ये चोरी

संशयिताला अटक, १.२० लाखांचा माल जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th January, 11:23 pm
म्हापशातील हॉस ऑफ कॅफीनमध्ये चोरी

म्हापसा : बोडगिणी-म्हापसा येथील विश्वाटी जंक्शनजवळील हॉस ऑफ कॅफीन हे रेस्टॉरन्ट फोडून आतील १.२० लाखांच्या वस्तू चोरण्यात आल्या. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी १२ तासांच्या आत महादेब बच्चीऊ दास (२८ रा. पर्रा व मूळ पश्चिम बंगाल) या चोरास अटक केली.
ही चोरीची घटना सोमवारी ६ रोजी उत्तररात्री दीडच्या सुमारास घडली होती. चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस येताच रेस्टॉरन्टचे मालक रोहन सावंत यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार केली. अज्ञात चोराने कॅफेच्या मुख्य दरवाजाच्या कडेला असलेली काचेची फ्रेम फोडली आणि आत प्रवेश केला. चोराने आतील सीसीटिव्ही कॅमेरांची मोडतोड केली. तसेच संगणक आणि एक मोबाईल फोन अशा १ लाख २० हजारांच्या वस्तू लंपास केल्या. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
पोलीस निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब, पंढरी चोपडेकर, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्सटेबल प्रकाश पोळेकर, तुकाराम कांबळी, अक्षय पाटील, आनंद राठोड, अनिल राठोड व राजेश कांदोळकर या पथकाने ही कामगिरी केली. पोलीस अधीक्षक अक्षत कौशल व उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, संशयित महादेब हा रोजंदारी रोकडा कामगार असून तो पर्रा येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता.   

संगणक, मोबाईल जप्त

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. या फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी लागलीच कारवाई केली व संशयिताला पकडून ताब्यात घेतले. तसेच संशयिताकडून चोरीचा संगणक व मोबाईल फोन जप्त केला.

      

हेही वाचा