पणजीतील वटवृक्षाबाबत तज्ञांचा अंदाज
कांपाल मैदानावर स्थलांतरित केलेले वडाचे झाड. (नारायण पिसुर्लेकर)
पणजी : कांपाल मैदानावर स्थलांतरित केलेल्या झाडाचे अस्तित्व फेब्रुवारी महिन्यात कळणार आहे. या महिन्यात झाडाची पाने गळून पडत असल्यामुळे सद्यस्थितीत ते झाड मेले की जिवंत आहे याचा निर्णय आता घेणे चुकीचे आहे, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सदर झाडाचे स्थलांतर करताना खूप नुकसान झाले असून ते जगू शकणार नाही, असेही पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.
सांतइनेज परिसरातील शीतल हॉटेलच्या पाठीमागे स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना रस्ता रुंदीकरणादरम्यान १०० वर्षे जुन्या वडाच्या झाडावर कुऱ्हाड बसली. दरम्यान, सदर झाड तेथून काढून टाकण्यासाठी पर्यावरणवाद्यांसह स्थानिकांनी विरोध केला. मात्र, स्मार्ट सिटी प्रशासनाने सदर झाड रातोरात तोडून सकाळी कांपाल परेड मैदानावर स्थलांतरित करून तेथे वृक्षारोपण केले.
या झाडाला जीवदान देण्यासाठी बरेच प्रयोग करण्यात आले. विविध उपचार पद्धतींमुळे सदर झाड जिवंत केले आणि त्याला हिरवीगार पालवी फुटली. मात्र, काही दिवसांनी पालवीसह संपूर्ण झाड सुकून गेले. यावेळी स्थलांतराच्या नावाखाली वडाची हत्या झाल्याची अोरड पर्यावरणवाद्यांनी केली.
एका जागेवरून दुसऱ्या जागी झाडाचे स्थलांतर हा उपाय असू शकत नाही. अशा वेळी ते झाड मरणारच. कारण झाडाचा विकास हा त्या झाडाच्या भोवतालच्या जागेवरूनच होत असतो, असे मत गोवा ग्रीन ब्रिगेड या पर्यावरणवादी संस्थेचे आवेर्तीन मिरांडा यांनी व्यक्त केले.
झाडाचे स्थलांतर करताना त्या झाडाच्या मुळांना आवश्यकतेनुसार माती नसल्यामुळे तसेच त्या वडाचे चार-पाच तुकडे करण्यात आले. या प्रक्रियेत वडाची मुळे दुखावल्यामुळे सदर वड मरणार हे निश्चित आहे. तसेच सदर झाड सखल भागात लावल्यामुळे तेथे पाण्याचे प्रमाण जास्त आहे. या पाण्यामुळे झाडाची मुळे कुजून गेली. त्यामुळे पाने आणि फांद्यासह पूर्ण झाड सुकून गेले. असाच प्रकार पर्वरी येथील वडाच्या झाडाचा होणार असल्याचे मिरांडा यांनी सांगितले.
सदर झाड जिवंत आहे की मेले याबद्दल सध्या बोलणे चुकीचे ठरणार असून फेब्रुवारी महिन्यानंतर खरी परिस्थिती लक्षात येईल. या महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते. त्यावेळी या झाडाला पालवी फुटते की नाही हे पाहूनच यावर बोलणे योग्य ठरेल.
- डॅनियल डिसोझा, ट्री ट्रान्सलोकेशन तज्ञ