स्थानिक आवक कमी, नारळाचे दर चढेच

पणजीत काही भाज्यांच्या दरात वाढ : काकडी ७० रुपये किलो

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 hours ago
स्थानिक आवक कमी, नारळाचे दर चढेच

पणजी : रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या नारळाचे दर अजूनही चढेच आहेत. सोमवारी पणजी बाजारात छोट्या आकाराचा नारळ ३० रु., मध्यम आकाराचे नारळ ४० रु. तर मोठे नारळ ५० रु. नग या दराने विकले जात होते. स्थानिक आवक कमी असल्याने पुढील काही दिवस नारळाचे दर चढेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोमवारी पणजी बाजारात काही भाज्यांच्या दरात वाढ झाली. बाजारात काकडीचे दर २० रुपयांनी वाढून ७० रुपये किलो झाले. मटारचे दर २० रुपयांनी वाढून १२० रुपये किलो झाले. बीटाचे दर १० रुपयांनी वाढून ६० रु. किलो झाले. गाजराचे दर २० रुपयांनी वाढून पुन्हा ८० रुपये किलो झाले. बटाटा आणि टोमॅटोचे प्रत्येकी ४० किलो होते. तर कांदे ५० रुपये किलो दराने विकले जात होते.
बाजारात कोबी ४० रुपये किलो तर फ्लॉवरचा एक गड्डा ४० रुपयाला होता. वांग्याचे दर १० रुपयांनी कमी होऊन ५० रुपये किलो झाले. मिरची, भेंडी, दोडकी, गवार, कारले प्रत्येकी ८० रुपये किलो होते. आल्याचे दर ४० रुपयांनी वाढून १६० रुपये किलो झाले. वालपापडीचे दर ४० रुपयांनी कमी होऊन १२० रूपये किलो झाले. ढब्बू मिरचीचे दर ९० रुपये किलो होते. लिंबू आकारानुसार ४ ते ५ रुपये ला एक नग या दराने विकले जात होते. मेथी २० रु., शेपू २० रु., पालक १० रु., कांदा पात १० रु., तर तांबडी भाजी १५ रु., कोथिंबीर २० रु., तर पुदिन्याची एक जुडी १० रुपयाला होती. तर अंडी ८० ते ८५ रुपये डझन या दराने विकली जात होती.
फलोत्पादन मंडळाच्या भाजीचा दर
फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर सोमवारी भेंडी ५८ रु., कोबी २२ रु., गाजर ६० रु., वालपापडी ७८ रु., मिरची ५० रु., कांदा ४३ रु., बटाटा ३४ रु. तर टोमॅटो २२ रुपये किलो होता.                   

हेही वाचा