यापुढे दोन वर्षांनी करावे लागणार नूतनीकरण; मंत्री गुदिन्होंची मागणी केंद्राकडून मान्य
पणजी : वाहन चालवण्याच्या परवान्याच्या नूतनीकरणाची मुदत वाढवण्याची वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मान्य केली असून, ही मुदत एक वर्षाऐवजी दोन वर्षे करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे गोव्यासह देशभरातील वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे.
गोव्यासह देशभरातील सर्वच राज्यांमधील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सर्व राज्यांच्या वाहतूक मंत्र्यांची दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीत बोलताना मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी गोव्यासाठी महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. ज्या राज्यांतील लोकसंख्या २० लाख किंवा त्यापेक्षा अधिक असते, त्याच राज्यांना केंद्राकडून ड्रायव्हिंग टेस्टिंग सेंटर दिले जाते. गोव्याची लोकसंख्या २० लाखांपेक्षा कमी असल्यामुळे गोव्याला हे सेंटर मंजूर झालेले नाही. यात लक्ष घालून मंत्री गडकरी यांनी गोव्याला एक ड्रायव्हिंग टेस्टिंग सेंटर मंजूर करून द्यावे, असे गुदिन्हो म्हणाले.
वाहन चालवण्याच्या परवान्याचे नूतनीकरण प्रत्येकवर्षी करावे लागते. अनेक वाहन चालक परवान्याचे नूतनीकरण करण्यास विसरतात. त्याचा त्यांना फटका बसतो. त्यामुळे एक वर्षाऐवजी तीन वर्षांनी परवान्याचे नूतनीकरण करण्याची संधी वाहन चालकांना देण्यात यावी, अशी मागणी गुदिन्हो यांनी केली होती. त्यांची ही मागणी मान्य करीत परवाना नूतनीकरणासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आलेली आहे. गोवा माईल्सने गोव्यातील स्थानिकांसाठी ‘गोंयचो पात्रांव’ योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत स्थानिक तरुणांना मोफत टॅक्सी देण्यात येतात. त्याच धर्तीवर केंद्र सरकारनेही अशा प्रकारची योजना सुरू करावी आणि त्याअंतर्गत राज्यांना बसेसचा पुरवठा करावा. त्यामुळे सर्वच राज्यांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आणखी बळकटी मिळेल, अशीही मागणी गुदिन्हो यांनी केली.
गडकरी २१ रोजी गोव्यात
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येत्या २१ जानेवारीला गोव्यात येणार आहेत. मुरगाव बंदरापासून महामार्गाला जोडणारा मार्ग आणि दाबोळी बोगमाळो जंक्शन ते केणीनगरपर्यंत बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे मंत्री गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.