विधानसभा निवडणूक भाजपशी युती करूनच लढवणार : सुदिन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबतच्या बैठकीत निर्णय झाल्याचेही केले स्पष्ट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th January, 11:18 pm
विधानसभा निवडणूक भाजपशी युती करूनच लढवणार : सुदिन

पणजी : आगामी विधानसभा निवडणूक मगो भाजपशी युती करूनच लढेल. हा निर्णय अगोदरच झालेला असून, त्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आमच्या बैठकाही झाल्या आहेत. जागा वाटपाचा निर्णय निवडणूक जवळ आल्यानंतरच घेतला जाईल, असे वीजमंत्री तथा मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मगो पक्ष सध्या भाजप सरकारमध्ये सहभागी आहे. आगामी विधानसभा निवडणूक मगो स्वबळावर लढणार की भाजपशी युती करणार असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, विधानसभा निवडणूक युतीने लढवण्याचा निर्णय अगोदरच झालेला आहे. त्यासंदर्भात आमच्या दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठकाही झालेल्या आहेत, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. जागा वाटपासंदर्भात काही निर्णय झालेला आहे का असा प्रश्न विचारला असता, जागा वाटपाचा निर्णय हा निवडणूक जवळ आल्यानंतरच घेतला जाईल. पुढील दोन वर्षे मगो पक्षाच्या संघटना राज्यभर चांगले काम करतील. ज्या मतदारसंघांत मगो बळकट आहे, त्या जागा मागितल्या जातील, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आमदार जीत आरोलकर यांच्याविषयी​ विचारले असता, जीत आरोलकरांचे प्रश्न पक्षाने मिटवलेले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ते मगोसोबतच राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले...
१. येत्या एप्रिलपासून मगो पक्ष विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार आहे. पक्षाच्या मतदारसंघांतील समित्या बरखास्त करण्यात आलेल्या असून, एप्रिलमध्ये नव्या समित्यांची स्थापना होईल.
२. अनेक मतदारसंघांतील मतदार अजूनही मगो पक्षासोबत आहे. सुमारे १५ मतदारसंघांत मगोचे मतदार आहेत. त्या सर्वच मतदारसंघांत काम सुरू केले जाणार आहे.
३. भाजपशी युती करून निवडणूक लढवण्यासह जागा वाटपाबाबत योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल.              

हेही वाचा