विमा, गुंतवणूक क्षेत्रात प्रामाणिक लोकांनी येणे आवश्यक: मुख्यमंत्री

विमा सखी मार्फत एलआयसी एजंट बनण्याची सुवर्ण संधी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th January, 02:52 pm
विमा, गुंतवणूक क्षेत्रात प्रामाणिक लोकांनी येणे आवश्यक: मुख्यमंत्री

पणजी : विमा किंवा अन्य गुंतवणुकीच्या क्षेत्रात प्रामाणिक लोकांनी येणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. मंगळवारी पणजीत विमा सखी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे गोपाळ पार्सेकर, दीपाली नाईक, भारतीय आयुर्विमा महांडळाच्या (एलआयसी) मंडळ अधिकारी संगीता परब व अन्य अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात विमा किंवा गुंतवणूक क्षेत्रात चांगले लोक येत नाहीत. याचा फायदा घेऊन राज्यात भामटे गुंतवणूकदार वाढले आहेत. असे लोक चांगल्या परताव्याचे आश्वासन देऊन लोकांकडून महिन्याला ५०० ते १००० रुपये जमा करतात. मात्र अनेक प्रकरणात गुंतवणूक केलेले पैसे परत देण्यात आले नाहीत. अशा भामट्यांवर सध्या खटले सुरू आहेत. मी कुणाचे नाव घेणार नाही. कारण असे केल्यास त्या कंपन्यांची नावे जाहीर होतील. मात्र एलआयसी सारख्या गेली ६८ वर्षे काम करणाऱ्या संस्थेमध्ये पैसे गुंतवावेत. या संस्थेमध्ये पैसे गुंतवल्यास अथवा विमा केल्यास तुम्हाला अधिकृत पावती देण्यात येते.

विमा सखी होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. विमा सखी होण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागेल. उत्तीर्ण होणाऱ्या या योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी ११ तालुक्यात सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानंतर त्यांना एलआयसी एंजट म्हणून काम करण्याची संधी मिळेल. या महिलांना केवळ दुसऱ्या व्यक्तीला विम्याचे महत्त्व समजावून सांगता आले पाहिजे. एका वर्षात २४ पॉलिसी केल्यास बोनस देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महिन्याला ७ हजार रुपये स्टायपॅन्ड

मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिसेंबर २०२४ मध्ये विमा सखी योजना सुरू केली होती. यानंतर राज्य पातळीवर अशी योजना सुरू करणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरले आहे. यानुसार महिलांना पहिल्या वर्षी प्रती महिना ७ हजार तर दुसऱ्या वर्षी प्रती महिना ६ रुपये दिले जातील. शिवाय बोनस म्हणून ४८ हजार रुपयापर्यंत मदत दिली जाईल.

१७ हजार लखपती दीदीचे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सबलीकरणसाठी कटिबद्ध आहेत. त्यांचा महिलांवर विश्वास आहे. यासाठीच त्यांनी महिलांसाठी अनेक उपयुक्त योजना सुरू केल्या आहेत. आमचे राज्यात १ हजार विमा सखी तसेच १७ हजार लखपती दीदी तयार करण्याचे लक्ष आहे.

हेही वाचा