अधिवेशनात ठराव संमत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्चासन
पणजी : तियात्र कला प्रकाराला युनेस्कोचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार असून आगामी अधिवेशनात या बाबतचा ठराव संमत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आश्वासन तियात्र अकादमीच्या शिष्टमंडळाला दिले आहे. तियात्र अकादमीचे अध्यक्ष अँथनी बार्बोझा यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
या मागण्यांचा विचार करून त्या सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याची माहिती अध्यक्ष अँथनी बार्बोझा यांनी दिली. तियात्र कला हे गोव्याचे वैशिष्ट्य आहे. ही कला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवण्याचे प्रयत्न सरकार करणार आहे. अकादमीतर्फे तियात्र महोत्सव आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाला सरकार आर्थिक साहाय्य करणार आहे. तियात्र भवनासाठी जमीन संपादन करण्याची प्रक्रीया सुरू आहे. जोपर्यंत तियात्र भवन होत नाही, तोपर्यंत सांकवाळ येथील कला भवनचे सभागृह तियात्र अकादमीला देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. अर्थसंकल्पात तियात्र अकादमीसाठी अधिक निधीची तरतूद केली जाईल. राजस्थान, गुजरात, नागपूर व मुंबई येथे आज तियात्राचे प्रयोग होऊ लागले आहेत. ही गोष्ट तियात्राची लोकप्रियता सिद्ध करणारी आहे. तियात्र कलाकारांना पद्मश्री पुरस्कारासह इतर राष्ट्रीय सन्मान मिळावेत, म्हणूनही सरकारद्वारे प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात फादर डोएल डायस, अवितो पीरिस दी मिनेझिस, प्रदीप नाईक, जीजस आंताव, विल्यम फर्नांडिस, आपलोन रीबेलो, आंतोनेत डिसोझा, पेद्रो वाझ, सायमन रीबेलो, सदस्य सचिव सुरेश दिवकर, विन्सी काद्रोस यांचा समावेश होता.