अंतर्गत वीजवाहिन्यांसह राज्यभरात अनेक कामे सुरू असल्याचेही केले स्पष्ट
पणजी : वीजमंत्रीपदी आपली वर्णी लागल्यापासून गेल्या दोन वर्षांत विविध कामांसंदर्भातील पाच हजार कोटींच्या निविदा खात्याने जारी केलेल्या आहेत. त्यातील अनेक कामे सध्या सुरू असल्याची माहिती मंत्री सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील विजेसंदर्भातील स्थानिकांच्या सर्व समस्या सोडवण्यावर आपण भर दिलेला आहे. त्यासाठी ट्रान्स्फॉर्मर, जीर्ण वाहिन्या बदलणे, उपकेंद्रांचे अपग्रेडेशन अशी अनेक कामे राज्यभरात सुरू आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने बार्देश तालुका महत्त्वाचा आहे. त्यामुळे या तालुक्यातील समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला असून, तेथील कामांसाठी सुमारे ३५० कोटी खर्च केले जाणार आहेत. पुढील वर्षभरात ही सर्व कामे पूर्ण होतील, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.
दरम्यान, स्मार्ट मीटरसंदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सरकार पातळीवरून याबाबतची पुढील प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तीन महिन्यांत आणखी २० चार्जिंग स्टेशन
गेल्या दोन महिन्यांत राज्यात २० चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलेली आहे. तर, पुढील तीन महिन्यांत आणखी २० स्टेशन विविध भागांमध्ये उभारली जाणार आहेत. इलेक्ट्रीक वाहने असलेल्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जात असल्याचेही मंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले.