पणजी : मुख्यमंत्री एलपीजी सिलिंडर सवलत योजनेतून महिन्याला २७५ रुपये मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना पुरावा म्हणून आधार कार्ड दाखवणे किंवा आधार ऑथेंटीकेशन प्रक्रिया करणे आवश्यक करण्यात आले आहे. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल तर नवीन कार्ड जारी होईपर्यंत रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड , बँक पासबुक, वाहन चालवण्याचा परवाना ओळख म्हणून वापरता येणार आहे.
याबाबत सार्वजनिक पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याचे संचालक जयंत तारी यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, सरकारी सेवांचा लाभ देताना आधार कार्डचा वापर केल्यास या प्रकियेत पारदर्शकता येते. आधार कार्ड असेल तर लाभार्थ्यांना थेट अन्य कोणत्याही कागदपत्रांशिवाय सहज सेवा मिळू शकते. याद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करणे सोपे होणार असल्याने या योजनेसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे.
पात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्ड नसलेल्या व्यक्तींनी नजीकच्या आधार केंद्रात जाऊन नवीन कार्ड करणे गरजेचे आहे. व्यक्तीच्या घरा जवळ तालुका स्तरावर आधार केंद्र नसेल तर योजना राबविणाऱ्या संस्थांनी अशी सोय उपलब्ध करून द्यावी. नवीन आधार कार्ड मिळेपर्यंत लाभार्थ्यांकडून आधार नोंदणीची पावती व वरील ओळख पत्राचे पुरावे घेऊन योजनेचा लाभ द्यावा असे अधिसूचनेत म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अंत्योदय अन्न रेशन कार्ड असणाऱ्या गरीब कुटुंबांना सवलत देण्यासाठी मुख्यमंत्री एलपीजी सिलिंडर योजना सुरू करण्यात आली होती. यानुसार लाभार्थ्यांना वर्षाला तीन एलपीजी सिलिंडरच्या किमतीसाठी आर्थिक मदत केली जाते. यानुसार लाभार्थ्यांना महिन्याला २७५ रुपये दिले जातात.