फोंडा : फोंडा पालिकेचे मुख्याधिकारी योगीराज गोसावी यांच्या स्वाक्षरीचा चुकीचा वापर करत बनावट उत्पन्नाचा दाखला दिल्याच्या आरोपांवरून फोंडा पोलिसांकडून नगरसेवक शिवानंद सावंत यांना अटक करण्यात आली आहे.
उत्पन्न प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या सदानंद प्रभुगावकर यांनी बनावट उत्पन्न दाखला जोडल्याचे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यांनी ही बाब पालिकेचे मुख्याधिकारी योगीराज गोसावी यांच्या निदर्शनास आणून दिली असता, दाखल्यावरील स्वाक्षरी बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर गोसावी यांनी याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात फिर्याद दिली. तक्रारीची दखल घेत फोंडा पोलिसांनी बुधवारी १८ डिसेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चौकशी केली असता सदानंद प्रभूगावकरच्या मुलीला हा दाखला देण्यात आल्याची बाब समोर आली. यात नगरसेवकाचा हात असल्याचे तपासात आढळून आल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा पोलीस उपनिरीक्षक आशिष वेळीप अधिक तपास करत आहेत.