मडगाव येथे आयोजन: सभापती तवडकर, आमदार कामत यांची उपस्थिती
मडगाव : मडगावातील बीपीएस स्पोर्टस क्लबमध्ये आयोजित पहिल्या गोवा बेळगाव एक्स्पोचे उद्घाटन सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार दिगंबर कामत, कॉमेडियन जॉन डिसिल्वा, बीपीएस क्लबचे अध्यक्ष योगिराज कामत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. एक्स्पोच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.
प्रुडंट मीडिया नेटवर्ककडून गोवा व बेळगावातील विविध नामवंत आस्थापनांचा सहभाग असलेल्या प्रदर्शन व विक्रीचा नवा उपक्रम यावर्षीपासून सुरू केलेला आहे. ढोलताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर सभापती तवडकर यांच्या हस्ते एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले.
सभापती तवडकर यांनी सांगितले की, प्रुडंट मीडियाकडून पहिल्यांदाच गोवा व बेळगाव एक्स्पो आयोजित करून बहुतांशी आस्थापनांना एकत्र आणले आहे. यातून गोवा व बेळगाव यांच्यातील दुवा दृढ केलेला आहे. गोमंतकीय ग्राहकांसाठी ही मेजवानीच आहे. गोव्यातील अनेकजण बेळगावात खरेदीसाठी जातात. आता बेळगावात खरेदीसाठी जाण्याऐवजी बेळगावातील आस्थापनांना गोव्यात आणलेली आहेत. खाद्यपदार्थांसह विविध वस्तू या ग्राहकांना आकर्षित करतील. या एक्स्पोतून बेळगावातील चांगल्या आस्थापनांची ओळख गोमंतकीयांना करून देण्यात आलेली आहे. आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणात हा एक्स्पो आयोजित करण्यात येईल, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
योगिराज कामत यांनी सांगितले की, गोवा बेळगाव एक्स्पो हा वेगळ्या प्रकारचा उपक्रम आहे.
याचा फायदा गोमंतकीय जनतेला होणार असून खरेदीसाठी बेळगावला जायला नको. असेच उपक्रम गोव्यातील विविध भागात आयोजित करावेत. महिलांसाठी कार्यक्रम आयोजित घेत प्रुडंट मीडिया नेटवर्कने घेतला हे कौतुकास्पद आहे. जॉन डिसिल्वा यांनी सांगितले की, प्रुडंट मीडिया नेटवर्कने बेळगावलाच गोव्यात आणलेले असून आवश्यक त्या सर्व वस्तू लोकांना याठिकाणी मिळतील. लोकांनी याठिकाणी येत खरेदी करावी. यावर्षीच्या एक्स्पोला प्रतिसाद मिळणार असून पुढील वर्षीही यापेक्षा मोठा एक्स्पो आयोजित करावा, असेही ते म्हणाले.
आमदार कामत यांनी सांगितले की, गोवा व बेळगावचा संबंध हा अनेक वर्षांपासून आहे. खरेदीसाठी अनेक वर्षांपासून गोव्यातील लोक बेळगावात जातात. गोव्यातील लोक बेळगावात गेल्यास पे पार्किंग करतात पण गोव्यात पे पार्किंग केल्यास विरोधासाठी उभे राहतात.
बेळगाव व मडगावचे नाते आणखी दृढ करण्याचे काम प्रुडंट मीडिया नेटवर्कने केलेले आहे. यावर्षी ग्राहकांचा प्रतिसाद मिळणार असून पुढील वर्षी आणखी आस्थापने या एक्स्पोत असतील, असेही ते म्हणाले. यावेळी प्रुडंट मीडिया नेटवर्कचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन रोहित वाडकर यांनी केले.
११ जानेवारीपर्यंत एक्स्पो सुरू
बेळगावात खरेदीला जाणार्यांना आता बेळगावातील खरेदी गोव्यातच करता येणार आहे, त्यांना बेळगावात जाण्याची गरज पडणार नाही. त्यासाठी प्रुडंट मीडिया नेटवर्ककडून मडगावातील बीपीएस स्पोर्टस क्लब येथे ११ जानेवारीपर्यंत गोवा बेळगाव एक्स्पो आयोजित केलेला आहे. सकाळी ११ ते रात्री ९ यावेळेत प्रदर्शन व विक्री ग्राहकांसाठी खुली असेल.