अपघातास कारणीभूत ट्रक चालकास अटक व सुटका
म्हापसा : भोवतावाडा, आसगाव येथे दारूच्या गोदामाचा लोखंडी खांब आणि ट्रकचा दरवाजा याच्यामध्ये चिरडल्याने गंभीर जखमी झालेल्या मसीह हंगरा लुगून (३७, रा. हणजूण व मूळ झारखंड) या लोडरचा मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालक रत्नाकर ठाकूर (रा. मयडे) यास हणजूण पोलिसांनी अटक केली. तर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.
हा अपघात सोमवार दि. ६ रोजी संध्याकाळी ६.२० च्या सुमारास घडला होता. आसगाव येथील स्वंगई डिस्ट्रीब्यूटरच्या गोदाममधील माल ट्रकमध्ये भरल्यानंतर सदर लोडर घटनास्थळी थांबला होता. ट्रक चालकाने ट्रकचा दरवाजा बंद न करता निष्काळजीपणे गाडी पुढे नेली असता लोडर दरवाजा आणि गोदामाच्या शेडच्या लोखंडी खांबमध्ये चिरडला गेला. लगेच जखमीला म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यास पुढील उपचारार्थ गोमेकॉत पाठवले. येथे उपचार सुरू असताना मसीह लुगून याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी पंचनामा केला. पोलीस हवालदार विशाल गावस यांच्या तक्रारीच्या आधारे या अपघातास कारणीभूत ट्रक चालकाविरूध्द पोलिसांनी गुन्हा नोंद केला व नंतर त्यास अटक केली. दरम्यान म्हापसा न्यायालयाने संशयिताची जामीनावर सुटका केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितेश शिंगाडी हे करीत आहेत.