सासष्टी : मडगावात रेल्वेच्या सिग्नल बॉक्सला आग, काही गाड्यांच्या वेळेवर परिणाम

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th January, 03:30 pm
सासष्टी : मडगावात रेल्वेच्या सिग्नल बॉक्सला आग, काही गाड्यांच्या वेळेवर परिणाम

मडगाव : मडगाव रेल्वेस्थानकानजीक आके भागाच्याबाजूने असलेल्या स्थानकाच्या परिसरातील सिग्नल जंक्शन बॉक्स व वाहिन्यांना आग लागण्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेमुळे रेल्वे संप्रेषण प्रणालीवर परिणाम झाला. काही गाड्या स्थानकांवर थांबवून ठेवत काम पूर्ण झाल्यावर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. यासाठी सुमारे तीन तासांचा कालावधी लागला व प्रवाशांनाही नाहक त्रास झाला.

मडगाव रेल्वेस्थानकावरील सिग्नल जंक्शन बॉक्सला आग लागण्याची घटना घडली व याचा परिणाम रेल्वे सेवांवर झाला. गुरुवारी पहाटेच्या सुमारास रेल्वेस्थानक परिसरातील आके भागाच्या बाजूने अपोलो व्हिक्टर इस्पितळाच्या नजीकच्या रेल्वे परिसरात कुणीतरी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कचरा जवळ करुन शेकोटी पेटवलेली होती. त्या आगीमुळे नजीकच्या रेल्वेच्या सिग्नल जंक्शन बॉक्स व वाहिनींना आग लागण्याची घटना सकाळी पावणेसात वाजता घडली.

याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाल्यावर त्यांनी मडगाव अग्निशामक दलाला बोलावले. अग्निशामक दलाकडून पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणण्यात आली. या आगीच्या घटनेमुळे रेल्वे संप्रेषण प्रणालीत अडथळे आले. यानंतर काही गाड्यांना मॅन्युअली सूचना देत पुढील स्थानकांवर थांबवण्यात आले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रणाली पूर्ववत करण्यात आली व गाड्या मार्गरत करण्यात आल्या. या घटनेमुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.

हेही वाचा