लाभ परत करण्याचे आदेश : इतरांकडून वसुलीची प्रक्रिया सुरू
समीप नार्वेकर
गोवन वार्ता
पणजी : गृहआधार योजनेचा लाभ घेतलेल्या २,९६० सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे परत करण्यास सांगण्यात आले आहे. यापैकी १९० कर्मचाऱ्यांकडून या योजनेची संपूर्ण रक्कम वसूल करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारने या योजनेची १.१३ कोटी रुपये रक्कम वसूल केली आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास संचालनालयाने दिली आहे.
गृहआधार योजनेंतर्गत, कुटुंबातील प्रत्येक महिलेला १,५०० रु. एवढे मानधन मिळते. तथापि, या योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सदर योजना बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून आतापर्यंत घेतलेले फायदे सरकारला परत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. काही सरकारी कर्मचाऱ्यांनी ५० हजार रु. पर्यंत लाभ घेतला आहे. पण, त्यांना एकाच वेळी परतफेड करणे शक्य नसल्याने, हा लाभ हफ्त्यांमधून भरावा, अशी सूचनाही सरकारने केली आहे.
दरम्यान, १९० कर्मचाऱ्यांकडून योजनेचा संपूर्ण लाभ १,०३,६२,८१२ रु. एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. तर ३६ जणांच्या थकबाकी वसुलीची प्रक्रिया सुरू आहे, ज्यापैकी ९,९२,४०० रु. वसूल झाले आहेत. या दोन्ही वसुली मिळून आतापर्यंत १,१३,५५,२१२ रु. एवढी रक्कम सरकारी तिजोरीत परत आलेली आहे.
गृह आधार योजनेअंतर्गत सरकारी कर्मचारी महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेत दुरुस्ती तसेच बदल सुरू आहेत. एखाद्या महिलेचा नवरा सरकारी कर्मचारी अथवा सरकारी महामंडळात नोकरीला असेल तर सदर महिला योजनेसाठी अपात्र ठरविणारी तरतूद २०१९ मध्ये करण्यात आली होती. यानंतर लाभार्थींचा आकडा आणखी कमी झाला होता.