तानावडेंनंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडूनही विषयावर पडदा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मंत्रिमंडळ फेरबदल सध्यातरी नाही, असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी या विषयावर पडदा टाकला. मंत्रिमंडळ फेरबदलांच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी ऊत आल्यानंतर राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनीही मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा निरर्थक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनीही मंत्रिमंडळात सध्यातरी फेरबदल होणार नसल्याचे स्पष्ट केले.
काँग्रेसचे आठ आमदार फुटून भाजपात आल्यापासून मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चा सुरू झाल्या. या आठपैकी किती जणांना मंत्रिपद मिळणार, याकडे जनतेचे लक्ष लागून होते. परंतु, आतापर्यंत एकमेव आलेक्स सिक्वेरा यांनाच मंत्रिपद देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यातील रणनीती आखत असताना भाजपने नीलेश काब्राल यांना वगळून आलेक्स सिक्वेरा यांची मंत्रिपदी वर्णी लावली. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे या दोघांनीही अनेकवेळा मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत दिले होते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री, आमदारांच्या वारंवार दिल्ली वाऱ्या सुरू झाल्यानंतर पुन्हा हा विषय चर्चेत आला होता. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी या चर्चा निरर्थक असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, काँग्रेसमधून भाजपात आलेले काही आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते मंत्रिमंडळ फेरबदलाची प्रतीक्षा करत आहेत. परंतु, भाजप श्रेष्ठींनी हा विषय अद्याप गांभीर्याने घेतला नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.
निवडणुकांनंतर फेरबदल शक्य
१. सध्या भाजपच्या संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. ३६ मतदारसंघांत मंडळ अध्यक्षांची नेमणूक केल्यानंतर आता ११ जानेवारी रोजी दोन्ही जिल्ह्यांच्या अध्यक्षपदांसाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर पक्षाकडून मंत्रिमंडळ फेरबदलाचा विचार सुरू होऊ शकतो, अशी माहिती भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
२. नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांच्या गौरवासाठी दोन दिवसांपूर्वी गोव्यात आलेल्या राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांची कोअर समितीच्या काही पदाधिकाऱ्यांसह काही आमदारांनीही वैयक्तिक भेट घेतली होती. त्यांच्याकडून सिंग यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. त्याबाबतचा अहवाल सिंग यांनी पक्षश्रेष्ठींना सादर केल्यानंतरच मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे या नेत्याने सांगितले.
३. भाजपला यावेळी कोणत्याही परिस्थितीत दिल्लीतील विधानसभा निवडणूक जिंकायची आहे. त्यामुळे केंद्रातील सर्व भाजप नेते सध्या निवडणुकीचा प्रचार आणि रणनीती आखण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे त्यांनी गोव्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाचा तूर्तास विचार केलेला नाही. दिल्लीतील निवडणूक झाल्यानंतर त्यांचे लक्ष गोव्याकडे वळू शकते, असेही या नेत्याने स्पष्ट केले.
इच्छुकांत तीव्र नाराजी
काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आणखी दोन आमदारांना मंत्रिपद देण्याची हमी भाजपने दिली होती. त्यामुळे हे दोन्ही आमदार मंत्रिमंडळ फेरबदलाकडे नजर लावून आहेत. आलेक्स सिक्वेरांना मंत्रिपद मिळाले तेव्हाच आपलीही मंत्रिमंडळात वर्णी लागेल असे त्यांना वाटत होते; परंतु त्यावेळी त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्याकडून संकेत येत असतानाही फेरबदल होत नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली होती. आता मुख्यमंत्र्यांनीच फेरबदल सध्यातरी नसल्याचे स्पष्ट केल्याने या आमदारांतील नाराजीत आणखी वाढ होणार आहे.