बाळांना लागण : दिवसभरात चौघांची चाचणी सकारात्मक
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : चीनमध्ये पसरलेल्या एचएमपीव्ही या करोनासदृश विषाणूचा सहावा रुग्ण भारतात आढळून आला आहे. तामिळनाडूमध्ये चेन्नई आणि सालेम येथे प्रत्येकी एक, असे दोन रुग्ण आढळून आले. यापूर्वी कोलकातामध्ये ५ महिन्यांच्या बाळामध्ये, अहमदाबादमध्ये एका दोन महिन्यांच्या बाळामध्ये, तर सोमवारीच कर्नाटकात तीन महिन्यांची मुलगी आणि आठ महिन्यांच्या मुलामध्ये हाच विषाणू आढळला होता.
जगाला हादरवून सोडणाऱ्या कोविड-१९ महामारीनंतर चीनमध्ये एचएमपीव्ही नावाच्या विषाणूने दार ठोठावले. आता भारतात रुग्ण आढळून येत आहेत. कर्नाटकातील दोन्ही प्रकरणांबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मुले नियमित तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचली होती. चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, मुलांचे नमुने सरकारी प्रयोगशाळेत नव्हे तर खासगी रुग्णालयात तपासण्यात आल्याचे कर्नाटक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
घाबरून जाण्याची आवश्यकता नाही : नड्डा
आरोग्यविषयक तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही. हा २००१ मध्ये आढळून आला होता. अनेक वर्षांपासून तो जगभर पसरत आहे. एचएमपीव्ही हा विषाणू श्वास घेताना हवेच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो आणि सर्व वयाच्या नागरिकांना होऊ शकतो. हा विषाणू हिवाळ्याच्या दिवसांत जास्त प्रमाणात पसरतो. याला घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली आहे.
तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या : डॉ. उत्कर्ष बेतोडकर
'एचएमपीव्ही' विषाणू २००१ मध्ये आढळला. तेव्हापासून या विषाणूचा जगभर प्रसार होत आहे. या विषाणूमुळे मृत्यू झाल्याची आतापर्यंत एकही नोंद नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. ताप, थंडी, सर्दी झाल्यास तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन संसर्गजन्य आजारांचे तज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी केले.