नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात १० जवान हुतात्मा

छत्तीसगडमधील घटना : आयईडीच्या स्फोटात वाहनाचाही चक्काचूर


06th January, 11:52 pm
नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात १० जवान हुतात्मा

नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटानंतर रस्त्यावर पडलेला खड्डा.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
रायपूर : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर सोमवारी दुपारी भ्याड हल्ला केला. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य केले. या स्फोटात भारतीय लष्कराच्या ९ जवानांसह एक चालक हुतात्मा झाला आहे. तर ५ हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती बस्तरच्या पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.
सोमवारी दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरचे संयुक्त ऑपरेशन पूर्ण करून परतत असताना बिजापूर जिल्ह्यातील कुत्रू-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी हा घातपात केला. नक्षलवाद्यांनी कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. ९ दंतेवाडा डीआरजी जवान आणि एक चालक यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
रविवारी पखंजूरमध्ये सुरक्षा दलाने ५ नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले होते. पंखजूर येथून नक्षलविरोधी संयुक्‍त मोहीम राबवून सोमवारी जवान परतत होते, असे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिला आहे. आयईडी हा सुमारे तीन किलो वजनाचा स्फोटक होता. स्‍फोट एवढा भीषण होता की, जवानांच्‍या वाहनाचे तुकडे झाले. मृतांची संख्‍या वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि जवानांचे पथक पाठवून बचाव कार्य करण्यात आले.
छत्तीसगडमधील बिजापूर येथे झालेल्या आयईडी स्फोटात डीआरजी जवानांच्या मृत्यूच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाले. मी शूर जवानांच्या कुटुंबियांप्रति मनापासून संवेदना व्यक्त करतो. हे दु:ख शब्दात मांडणे अशक्य आहे. आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही याची मी खात्री देतो. मार्च २०२६ पर्यंत आम्ही भारतीय भूमीतून नक्षलवाद संपवू.
_ अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री