मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पक्षाच्या नेत्यांच्या कामाबाबत काही तक्रारी, शंका असतील, तर त्याची वाच्यता बाहेर करू नका. प्रदेशाध्यक्ष किंवा सरचिटणीसांशी चर्चा करून तक्रारींचे निरसन करा, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी भाजपचे नेते, कार्यकर्त्यांना दिला.
नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. पक्षाने यावेळी मंडळ अध्यक्षपदासाठी वयाची अट घातली. त्यामुळे पक्षाच्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची संधी मिळाली. विद्यमान मंडळ अध्यक्षांपैकी ५० ते ६० टक्के मंडळ अध्यक्ष हे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत. तरुण मंडळ अध्यक्षांमुळे भाजपही आता तरुण झाला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
३६ मंडळांवर नव्या अध्यक्षांची नेमणूक झाली, म्हणजे जुन्या अध्यक्षांची जबाबदारी संपली असे नाही. त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. पुढील काळात त्यांच्या नियुक्त्या इतर पदांवर केल्या जातील, असे ते म्हणाले. मतदारसंघ जिंकण्यासाठी मंडळ अध्यक्षाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे नवनिर्वाचित अध्यक्षांनी जुन्या अध्यक्षांकडून मार्गदर्शन घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार काम करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा !
कार्यकर्त्यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला सुरुवात करावी. गत विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांत भाजप उमेदवारांचा पराभव झाला, त्या मतदारसंघांत जिंकण्यासाठी रणनीती आखा आणि सलग चौथ्यांदा विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकवा, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
वक्तव्याचा विपर्यास : काब्राल
घाबरण्याची गरज नाही, रडण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री कायम म्हणत असतात. त्यांचे तेच शब्द वापरून आपण नवीन अध्यक्षांना जनहितासाठी काम करण्याचा सल्ला दिला. या विधानातून आपण मुख्यमंत्र्यांवर टीका केली नव्हती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असा खुलासा कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी केला.