केंद्रीय अहवालातून स्पष्ट : मागील वर्षीच्या तुलनेत साठा ०.२ मीटरपर्यंत वाढला
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागील एका वर्षात राज्यातील नैसर्गिक स्रोतांमधील (भूजल) पाणी वापरात ३० लाख घन मीटरने वाढ झाली आहे. एका वर्षात राज्यात घरगुती, औद्योगिक व कृषी क्षेत्रासाठी पाण्याचा वापर वाढला आहे. २०२३ मध्ये राज्यात उपलब्ध भूजल साठ्यापैकी ६.८ कोटी घन मीटर पाणी वापरले गेले, तर २०२४ अखेरीस ७.१ कोटी घन मीटर पाण्याचा वापर करण्यात आला. असे असले तरी राज्यातील सर्व तालुक्यांतील भूजलसाठ्याचा वापर सुरक्षित आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, २०२३ मध्ये राज्यातील जमिनीत ३९.६ कोटी घन मीटर पाणी मुरले गेले. यातील ३१.७ कोटी घन मीटर पाणी वापरण्यायोग्य होते. २०२४ मध्ये राज्यातील जमिनीत ३८ कोटी घन मीटर पाणी मुरले गेले. यातील ३१ कोटी घन मीटर पाणी वापरण्यायोग्य होते. वरील दोन्ही वर्षांत राज्यातील उपयुक्त भूजल साठ्यापेक्षा कमी पाणी वापरण्यात आले. २०२३ मध्ये जमिनीतील उपयुक्त पाणी साठ्यापैकी २१.३७ टक्के वापरले गेले, तर २०२४ मध्ये राज्यातील उपयुक्त पाणी साठ्यापैकी २२.९१ टक्के पाणी वापरण्यात आले.
२०२४ मध्ये गोव्यात वापरण्यात आलेल्या एकूण भूजलापैकी घरघुती वापरासाठी सर्वाधिक ४ कोटी घन मीटर पाणी उपसण्यात आले. शेतीसाठी ३ कोटी उद्योगांसाठी वापरण्यात आले. २०२४ मध्ये उपयुक्त ३१ पैकी ७ कोटी घन मीटर पाणी वापरण्यात आले. २०२४ मध्ये ७० टक्के भूजलसाठा हा मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर पावसामुळे भरून निघाला आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये गोव्यासह अन्य १६ राज्यांत भूजलसाठा ०.२ मीटरपर्यंत वाढला असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
संपूर्ण देशाचा विचार करता २०२४ मध्ये जमिनीत सुमारे ४४ हजार कोटी घन मीटर पाणी मुरले गेले. यातील ५५ टक्के पाणी मान्सून काळात मुरले होते. २० टक्के अन्य कारणांमुळे तर १९ टक्के पाणी हे मान्सून काळातील पावसाशिवाय अन्य कारणांमुळे जमिनीत मुरले होते. यातील ४० हजार कोटी घन मीटर पाणी वापरण्यायोग्य होते. यावर्षी देशातील उपयुक्त पाणी साठ्यापैकी २२.९१ टक्के पाणी वापरण्यात आले. २०१७ च्या तुलनेत २०२४ मध्ये देशातील भूजल पातळी १५०० कोटी घन मीटरने अधिक भरली आहे.
अकरा वर्षांत राज्याच्या भूजल पातळीत घट
अहवालानुसार, राज्यातील भूजल पातळीत २०१३ ते २०२३ या अकरा वर्षांत ० ते २ मीटरने घट झाली आहे. वरील कालावधीत गोव्यातील सत्तरी आणि काणकोण तालुक्यांचा अत्यंत थोडा भाग वगळता बहुतेक ठिकाणी भूजल पातळी ही मान्सूनपूर्व व मान्सूनोत्तर काळात कमी झाल्याचे आढळून आले आहे.