मनोहर पर्रीकर बुद्धिबळ स्पर्धा उद्यापासून

१९ जानेवारीला समारोप : २३ देशांतील खेळाडू होणार सहभागी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
08th January, 11:19 pm
मनोहर पर्रीकर बुद्धिबळ स्पर्धा उद्यापासून

पणजी : स्व. मनोहर पर्रीकर गोवा आंतरराष्ट्रीय खुली ग्रँड मास्टर बुद्धिबळ चॅम्पियनशिप १० ते १९ जानेवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत जगभरातील २३ देशातील खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती गोवा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष महेश कांदोळकर यांनी दिली.
या स्पर्धेत ९७ विजेते खेळाडू असतील.गोवा बुद्धिबळ असोसिएशनने या स्पर्धेची माहिती देण्यासाठी पणजीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशिष केणी, कोषाध्यक्ष विश्वास पिर्लकर, उपाध्यक्ष अरविंद म्हामल उपस्थित होते.
गोवा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे आयो​जित दिवंगत मनोहर पर्रीकर गोवा आंतरराष्ट्रीय खुली ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धा श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम, ताळगाव येथे होणार आहे. १० रोजी स्पर्धेचे उद्घाटन होणार असून १० तारखेला पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेत अव्वल ग्रँड मास्टर्स आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बुद्धिबळ खेळाडू असतील. त्यामुळे भारत तसेच गोव्यातील उदयोन्मुख बुद्धिबळ खेळाडूंना उच्च रेटिंगसह ग्रँडमास्टर पदव्या देण्याचा प्रयत्न करण्याचे हे व्यासपीठ आहे, असे कांदोळकर म्हणाले.
गोव्यात तिसऱ्यांदा ही स्पर्धा होत आहे. पहिली स्पर्धा २०१८ मध्ये, दुसरी २०१९ आणि २०२१ मध्ये ऑनलाइन स्पर्धा झाली. २०१९ मध्ये, सध्याच्या विश्वविजेता ग्रँडमास्टर गुकेशने स्पर्धेत भाग घेतला आणि बक्षीस यादीत नववा क्रमांक पटकावला होता. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करतो, असे कांदोळकर म्हणाले.

एकूण ८५० खेळाडूंचा सहभाग 

स्पर्धेत एकूण ८५० खेळाडू सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये १९ ग्रँड मास्टर्स, ३५ आंतरराष्ट्रीय मास्टर्स, ७ महिला मास्टर्स, १३ फिडे मास्टर्स, ४ महिला फिडे मास्टर्स, ११ पुरुष फिडे मास्टर्स आणि ९७ विजेते खेळाडू सहभागी आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि क्रीडा मंत्री गोविंद गावडे उपस्थित राहणार आहेत.